‘शाळेभोवती’ नव्हे...शाळेतच साचले तळे; विद्यार्थ्यांना मिळाली सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 04:47 PM2019-09-23T16:47:37+5:302019-09-23T18:21:45+5:30
जिल्हा परिषद शाळा प्रांगणात आणि त्यानंतर वर्गखोलीत पाणी घुसल्याने विद्यार्थ्यांची एकच तारांबळ उडाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : मालेगाव तालुक्यात २३ सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस झाला असून, डव्हा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात पावसाचे पाणी घुसल्याने विद्यार्थ्यांची एकच तारांबळ उडाली. वर्गातही पाणी घुसल्याने शेवटी शाळेला सुट्टी द्यावी लागली. बरेच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या महत्वाच्या प्रश्नाकडे शिक्षण विभागाने साफ दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
२३ सप्टेंबर रोजी मालेगाव तालुक्यात जोरदार पाऊस झाला. यामुळे शेतकरी सुखावला तर दुसरीकडे डव्हा येथील जिल्हा परिषद शाळा प्रांगणात आणि त्यानंतर वर्गखोलीत पाणी घुसल्याने विद्यार्थ्यांची एकच तारांबळ उडाली होती. डव्हा येथील रस्ता आणि जिल्हा परिषद शाळेची जागा समसमान असल्याने पाऊस आला की थेट शाळेत शिरते. हा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित असून, याकडे शिक्षण विभागाने लक्ष दिले नाही. सोमवारी वर्गखोलीत पाणी शिरल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. काही विद्यार्थ्यांनी पावसाचा आनंदही लुटला. पाऊस आला की वर्गखोलीत शिरतो, या बाबीची कल्पना मुख्याध्यापकांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना दिली. परंतू, तातडीने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. यासंदर्भात प्रभारी गटशिक्षणाधिकारी गजानन परांडे यांच्याशी संपर्क केला असता, सभा सुरू असल्यामुळे केंद्र प्रमुखांना शाळेवर पाठविले आहे. शाळा परिसराची पाहणी करून योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे परांडे यांनी स्पष्ट केले.
शाळेत पावसाचे पाणी शिरल्याची माहिती शिक्षण विभागाला दिली आहे. शाळेत पुन्हा असा प्रकार घडू नये म्हणून आम्ही तेथे एक नाली काढून पाणी बाहेर जाण्याची व्यवस्था करणार आहोत.
- डी एस कीर्तनकार
मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा डव्हा