वाशिममधील ‘वाइन शॉपी’ थाटली ५०० मीटरच्या आत

By admin | Published: July 5, 2017 01:14 AM2017-07-05T01:14:55+5:302017-07-05T01:14:55+5:30

शुल्क विभागाच्या मोजणीत निष्पन्न: जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईची प्रतीक्षा!

In Washim, 'Wine Shops' would be within 500 meters | वाशिममधील ‘वाइन शॉपी’ थाटली ५०० मीटरच्या आत

वाशिममधील ‘वाइन शॉपी’ थाटली ५०० मीटरच्या आत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : स्थानिक जयभवानी नगरच्या हद्दीत नव्याने सुरू झालेल्या वाइन शॉपचे अंतर पाटणी चौकातून प्रत्यक्ष वाइन शॉपपर्यंत मोजले असता ५०० मीटरच्या आत म्हणजेच फक्त ४९८ मीटर असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या मोजणीत निष्पन्न झाले असून, आता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडून याप्रकरणी कोणती कारवाई केली जाते, त्याची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे.
राज्य उत्पादन शुल्काच्यावतीने शहरातील भवानी नगर परिसरात नवीन वाइन शॉप सुरू करण्याचा परवाना देण्यात आला. सदर वाइन शॉपमुळे परिसरातील रहिवासी व नागरिकांसह रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या नागरिकांना व महिला भगिनींना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. चक्क रस्त्यावर रात्रंदिवस दारुड्यांचे टोळके जमा होऊन महिलांना टार्गेट करीत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना मारहाण करण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सदरचे वाइन शॉप त्वरित बंद करण्यात यावे, यासाठी परिसरातील नागरिक आक्रमक झाले असून, वाइन शॉप हटविण्याकरिता आंदोलनासाठी सरसावले आहेत. राज्य उत्पादर शुल्क विभागाचे निरीक्षक नारायण सुर्वे यांनी २७ जून रोजी सदर प्रकरणाची चौकशी करून निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते. त्यानुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश कावळे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक नारायण सुर्वे यांनी मंगळवार, ४ जुलै रोजी दुपारी पाटणी चौक येथील राज्य महामार्ग ते संबंधित वाइन शॉपपर्यंतचे अंतर नागरिकांच्या उपस्थितीत सायकल यंत्राच्या साहाय्याने मोजण्यात आले होते. सदर सायकल यंत्राने ४९८ मीटर एवढे अंतर असल्याची नोंद केली असून, प्रत्यक्षात ५०० मीटरच्या नियमाला तडा दिला आहे.
याबाबत शासकीय विश्रामगृह येथे आमदार लखन मलिक यांचे स्वीय सहायक योगेश देशपांडे, नगरपालिकेचे नियोजन सभापती अमित मानकर, श्री एजन्सीचे संचालक किरण सोमाणी, नीलेश जयस्वाल, राजू दिग्रसकर, बबलू शर्मा, प्रकाश पेंढारकर, पवन पेंढारकर, पिंटू रोकडे, विजय रंगभाळ, आदींनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश कावळे यांची भेट घेतली. त्यांना सत्य परिस्थितीची माहिती दिली.
राज्य महामार्गाच्या कडेपासून ५०० मीटरच्या वर अंतर असलेल्या जागेत वाइन शॉप सुरू करण्याचा शासकीय नियम असताना ४९८ मीटरच्या जागेला ५०१ मीटरचे अंतर दर्शवून संबंधित वाइन शॉपला परवाना देण्यात आल्याची बाब पोलीस अधीक्षक कावळे याच्या निदर्शनात आणून दिली.
नियमानुसार महामार्गाच्या कडेपासून अंतर मोजणीचे आदेश असताना सदरची मोजणी महामार्गाच्या मध्यभागातून मोजणी केली असतानाही सदर वाइन शॉप फक्त ४९८ मीटरपर्यंत अंतरावर असल्याचे सिद्ध झाले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या बाबीकडे लक्ष घालून संबंधित वाइन शॉपी त्वरित व कायमची बंद करावी व महिला भगिनींसह नागरिकांना तसेच रहदारी करणाऱ्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा शहरवासी बाळगून आहेत.

संबंधित वाइन शॉपचे अंतर महामार्गापासून ५०० मीटरपेक्षा कमी म्हणजेच ४९८ मीटर एवढेच अंतर असल्याची नोंद आपल्या विभागाने केलेल्या सायकल यंत्राणे केली आहे. त्यामुळे याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून सदर वाइन शॉप बंद करण्याबाबत आपण प्रयत्न करू.
-राजेश कावळे,
पोलीस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क वाशिम, अकोला.

Web Title: In Washim, 'Wine Shops' would be within 500 meters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.