वाशिम: कोकलगाव-एकबुर्जी जलवाहिनीचे काम वेगात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 03:17 PM2018-04-03T15:17:09+5:302018-04-03T15:17:09+5:30
वाशिम: गतवर्षीच्या अल्प पावसामुळे वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणातील जलसाठा आटल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
वाशिम: गतवर्षीच्या अल्प पावसामुळे वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणातील जलसाठा आटल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यासाठी कोकलगाव बॅरेजमधून एकबुर्जीत पाणी आणण्याची तात्पुरती योजना मंजूर झाली असून, वाशिम नगर पालिकेच्यावतीने या योजनेच्या जलवाहिनीचे काम वेगात करण्यात येत आहे. या जलवाहिनीसाठी १२ किलोमीटरचे खोदकामही पूर्ण झाले असून, दोन किलोमीटरपर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली आहे.
वाशिम शहरात गतवर्षीच्या अपुऱ्या पावसानंतर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मे आणि जून महिन्यांत पाण्यासाठी हाहाकार होण्याची शक्यता असल्याने नगर पालिकेने कोकलगाव येथील बॅरेजमधील पाणी वाशिम शहराला देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. जवळपास १२ कोटी रुपयांच्या या योजनेला शासनाची मंजुरी मिळाली; परंतु कोकलगाव बॅरेजवर अवलंबून असलेल्या गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थांकडून या योजनेला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. तो विरोध वाढतच असल्याने योजनेचे काम रखडले होते. अखेर शासनाच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात या योजनेच्या कामाला १५ दिवसांपूर्वी सुरुवात झाली. त्यानंतर १२ दिवसांतच या योजनेच्या जलवाहिनीसाठी १२ किलोमीटर अंतराचे खोदकामही पूर्ण झाले असून, २ किलोमीटर अंतरापर्यंत जलवाहिनीही टाकण्यात आली आहे, तसेच पाणी खेचण्यासाठी ठिकठिकाणी आवश्यक त्या सुविधेचे कामही करण्यात आले आहे. येत्या महिनाभरातच या योजनेचे काम पूर्ण होऊन वाशिम शहराला पाणी पुरवठा सुरू होण्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.