वाशिम : विदेशी दारूसह ४.५७ लाखाचे साहित्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 04:16 PM2020-03-27T16:16:47+5:302020-03-27T16:16:53+5:30
एकूण ४ लाख ५७ हजार ६७७ रुपयाचा मुद्देमाल वाशिम ग्रामीण पोलिसांनी जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : संचारबंदी दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना २६ मार्च रोजी काकडदाती गावाजवळील किंग बार अॅण्ड रेस्टॉरन्ट येथे बारमालक व नोकर यांच्याजवळून विदेशी दारु, बिअर व ३ मोटारसायकल असा एकूण ४ लाख ५७ हजार ६७७ रुपयाचा मुद्देमाल वाशिम ग्रामीण पोलिसांनी जप्त केला.
सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी असून पोलिस प्रशासनातर्फे पेट्रोलिंग केली जात आहे. २६ मार्च रोजी पेट्रोलिंगदम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मद्य परवाना अनुज्ञप्ती बंदचे आदेश असतानाही, काकडदाती गावाजवळील किंग बार अॅण्ड रेस्टॉरन्ट या ठिकाणी वाशिम ग्रामीण पोलिसांनी धाड टाकली असता मद्य विक्री सुरू असल्याचे आढळून आले. बारमालक संतोष बबन सारसकर रा. काकडदाती, रामदास बबन सारसकर रा. काकडदाती, मनिष सुभाष बिल्लारी रा साईलिला नगर काकडदाती यांच्याजवळून विदेशी दारु, बिअर व ३ मोटार सायकल असा एकूण ४ लाख ५७ हजार ६७७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उपरोक्त तिघांविरुद्ध पोलीस स्टेशन वाशिम ग्रामिण येथे भादवी सह क ६५ ई मुप्रोका प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, सहायक पोलीस उपअधीक्षक पवन बनसोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनात वाशिम ग्रामीणचे ठाणेदार संजय शिपने, वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार योगिता भारद्वाज व त्यांच्या पथकाने केली.