वाशिम जिल्हा परिषदेचा १०.९३ कोटींचा अर्थसंकल्प सादर; पाणीपुरवठ्यावर विशेष भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2022 04:03 PM2022-02-18T16:03:31+5:302022-02-18T16:03:38+5:30
जि.प. स्थापनेनंतर प्रथमच शिवसेनेला मिळाला मान
वाशिम : जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचा सन २०२२-२३ चा अर्थसंकल्प आज, १८ फेब्रुवारी रोजी वसंतराव नाईक सभागृहात सादर करण्यात आला. जि.प.च्या स्थापनेनंतर प्रथमच अर्थसंकल्प सादर करण्याचा मान शिवसेनेला प्राप्त झाला असून सेनेचे जिल्हाप्रमुख तथा अर्थ व बांधकाम सभापती सुरेश मापारी यांनी अर्थसंकल्पाचे सादरीकरण केले. गतवर्षी १९ मार्च २०२१ रोजी जि.प.चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता.
कोरोनाचे संकट तेव्हा तीव्र असल्याने १६ सदस्यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने अर्थसंकल्पाचे सादरीकरण झाले होते. त्यानंतर काहीच महिन्यांत जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यात उकळीपेन जि.प. सर्कलमधून शिवसेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी बाजी मारून अर्थ व बांधकाम सभापतीपदही काबीज केले. त्यांनीच आज जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर केला.
पाणीपुरवठ्यासाठी सर्वाधिक तरतूद
आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात सर्वाधिक ५०.९२ लाखांची तरतूद शिक्षण विभागासाठी करण्यात आली आहे. यासह सार्वजनिक मालमत्तेच्या परिक्षणासाठी ५० लाख, आरोग्य विभागासाठी ४१ लाख ५ हजार, पाणीपुरवठा विभागासाठी ६४ लाख ८१ हजार, अनुसूचित जाती-जमाती आणि इतर दुर्बल घटकांचे कल्याण ३१ लाख ४० हजार, आदिवासी कल्याण विभागासाठी ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली.
याशिवाय अपंग कल्याण विभागासाठी १३ लाख ९१ हजार, महिला व बालकल्याण विभागासाठी ८० लाख, कृषी विभागासाठी ४५ लाख ११ हजार, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायासाठी १६ लाख, २००, पंचायत राज कार्यक्रमासाठी ६२ लाख ७६ हजार, पंचायत विभागासाठी ३ कोटी २९ लाख ३८ हजार; तर सार्वजनिक बांधकाम व्यवहारासाठी १० लाख, असा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.