वाशिम जिल्हा परिषद : १५ फेब्रुवारीला सभापतींचे खातेवाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 02:46 PM2020-02-12T14:46:10+5:302020-02-12T14:46:15+5:30
१५ फेब्रुवारी रोजी सभापतींचे खातेवाटप होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदाची निवडणूक अविरोध झाल्यानंतर, आता १५ फेब्रुवारी रोजी सभापतींचे खातेवाटप होणार आहे.
वाशिम जिल्हा परिषदेत एकूण ५० सदस्य संख्या असून, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक १२ सदस्य निवडून आले. त्याखालोखाल काँग्रेस ९, भारिप-बमसं ८, भाजपा ७, वाशिम जिल्हा जनविकास आघाडी ७, शिवसेना ६, स्वाभिमानी शेतकरी संघटना १ व अपक्ष दोन असे पक्षीय बलाबल आहे. महिला व बालकल्याण सभापतीपदी शोभा गावंडे व समाजकल्याण सभापतीपदी वनिता देवरे यांची निवड झाल्यानंतर उर्वरीत दोन विषय समिती आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांचे खाते वाटप झाले नव्हते. शेवटी खातेवाटपाचा मुहुर्त निघाला असून १५ फेब्रुवारी रोजी विशेष सभा बोलाविण्यात आली आहे.
यापूर्वी उपाध्यक्षांकडे अर्थ व बांधकाम असे दोन महत्वाचे खाते होते. यावेळी शिवसेनेने या खात्यावर दावा केला आहे. त्यामुळे उपाध्यक्षांकडे कोणते खाते सोपविले जाते, याकडे राजकीय क्षेत्राचे लागून आहे. दोन विषय समिती सभापती म्हणून काँग्रेसचे चक्रधर गोटे व शिवसेनेचे विजय खानझोडे यांची अविरोध निवड झालेली आहे. शिक्षण व आरोग्य तसेच कृषी व पशुसंवर्धन या दोन विषय समित्या पूर्वीप्रमाणेच राहतात की यामधील एक, एक खाते स्वतंत्र करून अन्य खात्याला जोडले जाते, याकडे लक्ष लागून आहे.
सभापतींच्या खातेवाटपासाठी १५ फेब्रुवारी रोजी विशेष सभा बोलाविण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिली. (प्रतिनिधी)