बदल्यांच्या हंगामातही वाशिम जिल्हा परिषदेला विभागप्रमुखच मिळेनात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 11:50 AM2021-08-11T11:50:46+5:302021-08-11T11:50:52+5:30

Washim Zilla Parishad : जिल्हा परिषदेसाठी अधिकाऱ्यांची ‘ना’ ही ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अडचणीची ठरत आहे.

Washim Zilla Parishad did not get a head of department | बदल्यांच्या हंगामातही वाशिम जिल्हा परिषदेला विभागप्रमुखच मिळेनात!

बदल्यांच्या हंगामातही वाशिम जिल्हा परिषदेला विभागप्रमुखच मिळेनात!

Next

- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  गत १५ दिवसांपासून शासनस्तरावरून अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविली जात आहे. वाशिम जिल्हा परिषदेत विभागप्रमुखांची १० पदे आणि गटविकास अधिकाऱ्यांची चार पदे रिक्त असताना, अद्याप विभागप्रमुख म्हणून वाशिमला कुणीही बदलीवर आले नाही. जिल्हा परिषदेसाठी अधिकाऱ्यांची ‘ना’ ही ग्रामीण विकासाच्या दृष्टीने अडचणीची ठरत आहे.
ग्रामीण भागाचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत एकूण १६ विभाग आहेत. दिमतीला सहा पंचायत समित्या आहेत. सद्यस्थितीत १६ पैकी तब्बल १० विभागाला कायमस्वरुपी विभागप्रमुख नाहीत तर सहापैकी चार पंचायत समितीला गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी नाहीत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत व स्वच्छता मिशन), बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी,  मुख्य लेखा व वित्त अधिकारी अशी १० पदे रिक्त आहेत. 
सध्या शासनस्तरावरून अधिकाऱ्यांची बदली प्रक्रियेची धूम सुरू आहे. मात्र, जिल्हा परिषदेला अद्याप एकही अधिकारी मिळाले नाहीत. वाशिम जिल्हा परिषदेत येण्यासाठी अधिकारी उत्सुक का नाहीत? याचे आत्मचिंतन होणेही गरजेचे आहे. दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार बदलीचे ठिकाण मिळत असेल तर मग दुर्गम व मागास भागातील जिल्ह्यांचा वाली कोण? असाही प्रश्न आहे. 


ज्येष्ठ, कनिष्ठतेचा मुद्दा !
जिल्हा परिषदेतही ज्येष्ठ, कनिष्ठतेचा मुद्दा असून, कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे सर्रास प्रभार सोपविण्यात येतो. कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या हाताखाली ज्येष्ठ अधिकाऱ्यांना काम करावे लागत असल्याने भेदभाव होत असल्याची ज्येष्ठ अधिकाऱ्यांमध्ये भावना आहे. प्रभार सोपविताना ज्येष्ठतेचा विचार करून जिल्हा परिषद प्रशासनाने शासन नियमाची अंमलबजावणी करावी, असा सूर ज्येष्ठ अधिकाऱ्यांमधून उमटत आहे.

Web Title: Washim Zilla Parishad did not get a head of department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.