१६ जूनला वाशिम जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या बदल्या
By admin | Published: June 12, 2014 09:34 PM2014-06-12T21:34:53+5:302014-06-12T21:35:25+5:30
वाशिम जिल्हा परिषदेतील शिक्षक संवर्ग वगळता अन्य कर्मचार्यांच्या बदल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेत करण्याबाबत राज्य शासनाने
वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेतील शिक्षक संवर्ग वगळता अन्य कर्मचार्यांच्या बदल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेत करण्याबाबत राज्य शासनाने वाशिम जि.प.प्रशासनाला परवानगीच्या रुपाने हिरवी झेंडी दाखविली आहे. त्यामुळे आता १६ जून रोजी जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या बदल्याची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. वाशिम जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे समायोजन झाले नसल्यामुळे त्यांच्या बदल्या यावर्षी स्थगित करण्यात आल्या; परंतु अन्य सर्व कार्यालयातील अधीक्षक, कनिष्ठ लिपीक, पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व इतर कर्मचार्यांच्या बदल्या करण्यासाठी २३ मे रोजी जिल्हा परिषदेतील सभागृहात सर्व कर्मचार्यांना बोलवण्यात आले होते तेथे जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी येऊन विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे बदल्याची प्रक्रिया स्थगित केली आहे. याबाबत राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागण्यात येणार असून, त्यानंतर परवानगी मिळाल्यास बदल्या केल्या जातील, असे सांगितले होते. त्यामुळे यावर्षी बदल्या होणार नाहीत, अशा अपेक्षेत कर्मचारी होते; मात्र राज्य शासनाने आचारसंहिता असली तरी बदल्या करता येतील, असे कळविले आहे. त्यामुळे आता जि.प.कर्मचार्यांच्या बदल्या होणार, हे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांना संपर्क साधून विचारले असता, त्यांनी १६ जून रोजी कर्मचार्यांच्या समुपदेशनाने व पारदर्शक पद्धतीने बदल्या केल्या जाणार असल्याचे सांगितले.