वाशिम जिल्हा परिषद अभियंते दुसऱ्या दिवशीही सामुहिक रजेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 04:38 PM2018-03-20T16:38:41+5:302018-03-20T16:38:41+5:30
वाशिम : विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे सर्व पदाधिकारी २० मार्च रोजीदेखील सामुहिक रजा आंदोलनावर असल्याने कामकाज ठप्प झाले होते.
वाशिम : विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे सर्व पदाधिकारी २० मार्च रोजीदेखील सामुहिक रजा आंदोलनावर असल्याने कामकाज ठप्प झाले होते.
जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या अभियंता संघटनेने विविध टप्प्यात आंदोलन पुकारले आहे. १९ व २० मार्च रोजी अभियंत्यांनी सामुहिक रजा आंदोलन केले. जिल्हा परिषद अभियंता संघटना, महाराष्ट्र या नोंदणीकृत संघटनेस शासन मान्यता देणे, जि.प. अभियंत्यांना प्रवासभत्त्यापोटी दरमहा किमान १० हजार रुपये मासिक वेतनासोबत अदा करणे, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने दिलेल्या निर्देशानुसार नवीन उपविभाग तत्काळ निर्माण करणे, जिल्हा परिषदेकडील अभियंता सवंर्गास शाखा अभियंता पदाचा दर्जा देण्याचा दिनांक व त्या बाबत करावयाची वेतन निश्चिती, यासह विविध मागण्या निकाली काढण्याची मागणी अभियंता संघटनेने लावून धरली. दरम्यान, २० मार्च रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या प्रलंबित मागण्या शासनाने निकाली काढाव्या, याबाबत पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन देशमुख यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. यावेळी संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष विश्वास घुगे, जिल्हा सचिव प्रवीण दुरतकर, कार्याध्यक्ष महेश कान्हेरकर, कोषाध्यक्ष तेजराव जाधव यांच्यासह विविध विभागांचे अभियंते सहभागी होते. दरम्यान, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना (रजि.नं. ६१५) यासह जिल्हा परिषदेच्या विविध संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.