वाशिम जिल्हा परिषद सभापती पदासाठी रस्सीखेच!
By admin | Published: July 6, 2016 03:10 AM2016-07-06T03:10:16+5:302016-07-06T03:10:16+5:30
सत्ताधारी व मित्रपक्षाच्या सदस्यांची मोर्चेबांधणी : विरोधकांचे ‘वेट अँण्ड वॉच’, ८ जुलै रोजी निवडणूक.
वाशिम : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक एकहाती जिंकल्यानंतर, आता सत्ताधारी व मित्रपक्षांच्या सदस्यांमध्येच विषय समितीच्या सभापती पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. ८ जुलै रोजी होणार्या निवडणुकीत भाजपा-सेना व विरोधकांनी सध्यातरी ह्यवेट अँण्ड वॉचह्णची भूमिका घेतल्याचे दिसून येते.
मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर २0१३ मध्ये झाली होती. या निवडणुकीत १७ जागा घेऊन काँग्रेस हा पक्ष जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला प्रत्येकी आठ, भाजपा व अपक्ष प्रत्येकी सहा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना चार व भारिप-बमसं तीन असे पक्षीय बलाबल राहिले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस युतीने अपक्षांच्या मदतीने जिल्हा परिषदेची सत्ता मिळविली.
अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने २९ जून रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. सत्तापालट करण्यासाठी शिवसेना, भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी अपक्ष, मनसे सदस्यांबरोबरच काँग्रेस-राकाँचा नाराज गट फोडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. जिल्हा परिषदेवर भाजपा-सेनेचा झेंडा फडकविण्याच्या इराद्याने राजकीय आखाड्यात उतरलेल्या विरोधकांचे आक्रमण परतवून लावण्यासाठी इकडे काँग्रेस-राकाँच्या स्थानिक दिग्गज नेत्यांनी पक्षांतर्गतचे वाद बाजूला सारून बैठकांचा सपाटा लावला. माजी खासदार अनंतराव देशमुख, आमदार अमित झनक, माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे, माजी आमदार प्रकाश डहाके हे चारही दिग्गज एका ठिकाणी बसल्याने अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक काँग्रेस-राकाँने अपक्ष व भारिपच्या मदतीने एकहाती जिंकली. अध्यक्षपदी काँग्रेसच्या हर्षदा दिलीप देशमुख, तर उपाध्यक्षपदी राकाँचे चंद्रकांत ठाकरे मताधिक्क्याने विजयी झाले. आता विषय समिती सभापती पदासाठी ८ जुलै रोजी निवडणूक होत आहे. सभापतीपदी विराजमान होण्यासाठी सत्ताधारी काँग्रेस-राकाँ व अपक्ष सदस्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. दुसरीकडे अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत करारी हार पत्करावी लागल्याने विरोधक सध्यातरी ह्यवेट अँण्ड वॉचह्णच्या भूमिकेत असल्याचे दिसून येते.