वाशिम जिल्हा परिषद सभापतींचे खातेवाटप; विषय समित्यांचे वाटप रखडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 02:46 PM2020-02-16T14:46:20+5:302020-02-16T14:46:38+5:30
ऐनवेळी अडचणी उद्भवल्याने विषय समिती सदस्यांच्या निवडी लांबणीवर पडल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतीपदाची निवडणूक अविरोध झाल्यानंतर, १५ फेब्रुवारी रोजी सभापतींचे खातेवाटप करण्यात आले. त्यात उपाध्यक्ष डॉ. श्याम गाभणे यांना कृषी व पशुसंवर्धन, चक्रधर गोटे यांना शिक्षण व आरोग्य; तर विजय खानझोडे यांना अर्थ व बांधकाम सभापतीपद मिळाले. दरम्यान, ऐनवेळी अडचणी उद्भवल्याने विषय समिती सदस्यांच्या निवडी लांबणीवर पडल्या.
वाशिम जिल्हा परिषदेत एकूण ५० सदस्य संख्या असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक १२ सदस्य आहेत. त्याखालोखाल काँग्रेस ९, भारिप-बमसं ८, भाजपा ७, वाशिम जिल्हा जनविकास आघाडी ७, शिवसेना ६, स्वाभिमानी शेतकरी संघटना १ व अपक्ष दोन असे पक्षीय बलाबल आहे. दरम्यान, महिला व बालकल्याण सभापतीपदी शोभा गावंडे व समाजकल्याण सभापतीपदी वनिता देवरे यांची यापुर्वीच निवड झाल्यानंतर उर्वरीत दोन विषय समिती आणि जिल्हा परिषद उपाध्यक्षांचे खाते वाटप प्रलंबित होते. ती प्रक्रिया ठरल्यानुसार शनिवारी पार पडली; मात्र विषय समितीत सदस्यांचा समावेश करण्यासंबंधी सकाळी ११ वाजतापर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस, जनविकास आघाडी, भाजपा, भारिप बमसंच्या सदस्यांनी अर्ज सादर केले. वेळेनंतर काँग्रेस व शिवसेना सदस्यांचे अर्ज येत असल्याचे पाहून त्यास जनविकास आघाडी, भाजपा सदस्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे समिती सदस्यांची निवड प्रक्रिया रखडली आहे.
अर्थ व बांधकाम, कृषी व पशुसंवर्धन, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, शिक्षण व आरोग्य अशा पाच समित्यांमध्ये जवळपास ७ ते १० सदस्य राहतात. या पदासाठी अर्ज भरणाऱ्या सदस्यांमधून समिती सदस्यांची निवड केली जाणार होती; मात्र ही प्रक्रिया आता प्रलंबित असून त्यासाठी जिल्हा परिषदेचे विशेष सभा बोलाविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
समिती सदस्य पदासाठी अर्ज करण्याची मुदत शनिवारी सकाळी ११ वाजतापर्यंत देण्यात आली होती; मात्र त्यानंतरही काही सदस्यांनी अर्ज दाखल केल्याने त्यास इतर काही सदस्यांनी आक्षेप घेतला. तथापि, या पदासाठी प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर पुढील प्रक्रिया राबविली जाणार आहे.
- चंद्रकांत ठाकरे
अध्यक्ष, जि.प. वाशिम
समिती सदस्य पदासाठी अर्ज भरण्याची वेळ सकाळी ११ वाजतापर्यंतच होती. या मुदतीनंतर मात्र काँग्रेस व शिवसेनेचे काही सदस्य अर्ज दाखल करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आम्ही आक्षेप घेतला. नियमानुसार निवड प्रक्रिया राबवावी, अशी आमची मागणी आहे. त्यात कुणावरही अन्याय होणार नाही, अशी अपेक्षा आहे.
- स्वप्नील सरनाईक
गटनेता, जनविकास आघाडी