वाशिम जि.प. अध्यक्ष पदासाठी २९ जून रोजी निवडणूक
By admin | Published: June 22, 2016 12:39 AM2016-06-22T00:39:10+5:302016-06-22T00:39:10+5:30
निवड सभेबाबत सदस्यांना पत्र; जनहित याचिकेवर आज सुनावणी.
वाशिम : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा अडीच वषार्ंचा कार्यकाळ ३0 जून रोजी संपणार आहे. दरम्यान, अध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीवर एका सदस्याने आक्षेप घेतल्याने निवडणूक कधी होणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. आता निवडणूक निर्णय अधिकार्यांनी २९ जून रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसंदर्भात सभा असल्याबाबतचे पत्र सदस्यांना रवाना केल्याने तूर्तास संभ्रम दूर झाला आहे. दुसरीकडे आरक्षण सोडतप्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेवर २२ जून रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती याचिकाकर्ते विकास गवळी यांनी दिली.
वाशिम जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर २0१३ मध्ये झाली होती. या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १७, राष्ट्रवादी काँग्रेस आठ, शिवसेना आठ, भाजपा व अपक्ष प्रत्येकी सहा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना चार व भारिप-बमसं तीन असे पक्षीय बलाबल राहिले. अध्यक्ष व सभापतींच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस युतीने अपक्षांच्या मदतीने सत्ता मिळविली. अध्यक्ष, उपाध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ ३0 जून रोजी संपत असल्याने आता २९ जून रोजी निवडणूक होणार आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकार्यांनी सर्व जिल्हा परिषद सदस्यांना पत्र रवाना करून २९ जून रोजी जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी निवड सभा होणार असून, याला उपस्थित राहण्याचे कळविले आहे. दुसरीकडे जनहित याचिकेवरील निर्णय प्रलंबित आहे.