Washim ZP : विषय समित्यांसाठी चढाओढ; निवडीला उरला एक दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 03:52 PM2020-01-28T15:52:33+5:302020-01-28T15:52:49+5:30
भारिप-बमसंकडून इच्छुकांची यादी मोठी असल्याने २८ जानेवारीच्या रात्रीला किंवा २९ जानेवारीला सकाळी सभापती पदाच्या उमेदवाराचे नाव निश्चित होईल, असे सांगितले जाते.
- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषदेच्या चार विषय समितीच्या सभापती पदासाठी २९ जानेवारी रोजी निवडणूक होत असून, अद्याप कोणत्या पक्षाला कोणती विषय समिती द्यावयाची याचा निर्णय होऊ शकला नाही. २८ जानेवारी रोजी यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता राजकीय गोटातून वर्तविण्यात येत आहे.
वाशिम जिल्हा परिषदेची एकूण सदस्य संख्या ५२ असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडे १२, काँग्रेस ९, भारिप-बमसं ८, भाजपा ७, वाशिम जिल्हा जनविकास आघाडी ७, शिवसेना ६, स्वाभिमानी शेतकरी संघटना १ व अपक्ष दोन असे पक्षीय बलाबल आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भारिप-बमसंशी हातमिळवणी करून विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळविले. अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर उपाध्यक्ष पद काँग्रेसकडे आल्याने आता विषय समितीच्या निवडणुकीत महत्त्वाची समिती मिळावी यासाठी शिवसेना व भारिप-बमसं आग्रही असल्याचे राजकीय गोटात बोलले जात आहे. सभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते पांडूरंग ठाकरे किंवा माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या गटातील सदस्याचे नाव २८ जानेवारी रोजी निश्चित होण्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले. काँग्रेसकडून तुर्तास चक्रधर गोटे, दिलीप मोहनावाले यांची नावे स्पर्धेत असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेकडून माजी शिवसेना जिल्हा प्रमुख डॉ. सुधीर कव्हर यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. भारिप-बमसंकडून इच्छुकांची यादी मोठी असल्याने २८ जानेवारीच्या रात्रीला किंवा २९ जानेवारीला सकाळी सभापती पदाच्या उमेदवाराचे नाव निश्चित होईल, असे सांगितले जाते. रिसोड विधानसभा मतदारसंघातील सदस्याकडे सभापती पद जाण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या समितीवर सेना, भारिप ठाप
जिल्हा परिषदेत शिक्षण व आरोग्य, कृषी व पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण आणि समाजकल्याण अशा चार विषय समित्या आहेत. या चार विषय समितीमध्ये शिक्षण व आरोग्य, समाजकल्याण या महत्त्वाच्या समितीसाठी शिवसेना, भारिप-बमसं ठाम असल्याचे वृत्त आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भारिप-बमसं अशा चार पक्षांना प्रत्येकी एक सभापती पद दिले जाणार आहे. कोणत्या पक्षाला कोणते सभापती पद द्यावे, याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. २८ जानेवारीच्या समन्वय बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक अविरोध झाली; त्याचप्रमाणे विषय समिती सभापती पदाची निवडणूकदेखील अविरोध कशी होईल, यावर महाविकास आघाडी व भारिप-बमसंचा भर आहे.
- चंद्रकांत ठाकरे
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
जिल्हा परिषद विषय समिती वाटप अजून निश्चित झाले नाही. महाविकास आघाडी आणि भारिप-बमसंच्या समन्वयातून विषय समितीचे वाटप ठरणार आहे. २८ जानेवारी रोजी यासंदर्भात बैठक होऊ शकते.
- अॅड. दिलीपराव सरनाईक
जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
जिल्हा परिषदेच्या विषय समितीचे वाटपासंदर्भात उद्या बैठक होऊ शकते. या बैठकीत कोणती विषय समिती कोणत्या पक्षाला द्यावयाची, याचा निर्णय होईल. तुर्तास तरी विषय समिती वाटप ठरलेले नाही.
-डॉ. नरेश इंगळे
महासचिव, भारिप-बमसं
नियोजित कार्यक्रमानुसार जिल्हा परिषदेच्या विषय समितीचे वाटप ठरले आहे. शिवसेनेला जी समिती हवी आहे, ती समिती मिळणार आहे. महाविकास आघाडी व भारिप-बमसंची सत्ता येईल, असा विश्वास आहे.
- सुरेश मापारी
जिल्हाध्यक्ष, शिवसेना