वाशिम जि. प. व पं.स. निवडणूक : ३९६ उमेदवारांची माघार; ७६९ रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 02:05 PM2019-12-31T14:05:03+5:302019-12-31T14:05:27+5:30
निवडणूक रिंगणात शिल्लक राहिलेल्या सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आल्याने आता शेवटच्या काही दिवसांत प्रचारकार्याला वेग मिळणार असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अवघ्या ८ दिवसांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीतून १७६ आणि पंचायत समितीच्या निवडणूकीतून २२० असे एकूण ३९६ नामांकन सोमवार, ३० डिसेंबर रोजी मागे घेण्यात आले; तर ७२४ नामांकन अर्ज कायम राहिले आहेत. दरम्यान, ही प्रक्रिया पार पडण्यासोबतच निवडणूक रिंगणात शिल्लक राहिलेल्या सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आल्याने आता शेवटच्या काही दिवसांत प्रचारकार्याला वेग मिळणार असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा परिषदेचे ५२ गट व पंचायत समितीच्या १०४ गणांसाठी येत्या ७ जानेवारी रोजी निवडणूक होऊ घातली आहे. ग्रामीण भागातील राजकीय पकड मजबूत करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या निवडणूकीत बाजी मारण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी व उमेदवारांनी जय्यत तयारी केलेली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंतही महाविकास आघाडीत सहभागी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र लढण्यासंबंधी ठोस निर्णय न झाल्याने तीन्ही पक्ष स्वतंत्ररित्या निवडणूकीला सामोरे जात आहेत. दुसरीकडे भाजपा, वंचित बहुजन आघाडी आणि माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या जिल्हा जनविकास आघाडीनेही जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये दमदार ‘एन्ट्री’ मारण्याकरिता आपापल्या स्तरावर रणनिती आखली आहे.
गत पाच वर्षात विविध राजकीय पक्षांचे संघटन वाढविण्यासाठी अहोरात्र झटलेल्या काही कार्यकर्त्यांना ऐनवेळी तिकीट नाकारण्यात आल्याने बंडखोरीचा प्रकार उफाळून आला आहे. परिणामी, सर्वच जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांमध्ये अपक्षांची संख्या देखील तुलनेने वाढल्याचे दिसून येत आहे.
सोमवारी वाशिम तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १० गटांमध्ये दाखल ८२ अर्जांपैकी ३२ अर्ज मागे घेण्यात आले; तर ५० अर्ज कायम राहिले. पंचायत समितीच्या २० गणांमधून दाखल ११३ अर्जांपैकी ३६ अर्ज मागे घेण्यात येऊन ७७ अर्ज कायम राहिले. मालेगाव तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गटांमध्ये दाखल ९९ अर्जांपैकी ४६ अर्ज मागे घेण्यात आले; तर ५३ अर्ज कायम राहिले. पंचायत समितीच्या १८ गणांमध्ये दाखल १२६ अर्जांपैकी ३८ माघार होऊन ८८ कायम राहिले. रिसोड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ९ गटांमध्ये दाखल ६४ अर्जांपैकी २१ माघार, ३७ रिंगणात. पंचायत समितीच्या १८ गणांमध्ये दाखल १३२ अर्जांपैकी ४८ माघार, ७२ अर्ज कायम राहिले. मानोरा तालुक्यातील जिल्हा पषिदेच्या ८ गटांमध्ये दाखल ७० अर्जांपैकी ३१ माघार, ३९ कायम. पंचायत समितीच्या १६ गणांमध्ये दाखल १२५ अर्जांपैकी ३७ माघार, ८२ अर्ज कायम राहिले. मंगरूळपीर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ८ गटांमध्ये दाखल ५८ अर्जांपैकी २३ माघार, ३५ कायम. पंचायत समितीच्या १६ गणांमध्ये दाखल ११७ अर्जांपैकी ४७ माघार; तर ७० अर्ज कायम राहिले. यासह कारंजा तालुक्यातील ८ जिल्हा परिषद गटांमध्ये दाखल झालेल्या ७२ अर्जांपैकी २३ माघार, ४९ कायम आणि पंचायत समितीच्या १६ गणांमध्ये दाखल ८६ अर्जांपैकी १४ अर्ज मागे घेण्यात येऊन ७२ अर्ज कायम राहिले आहेत.