Washim ZP Election : सत्ता स्थापनेसाठी संख्याबळाची जुळवाजूळव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 03:33 PM2020-01-10T15:33:59+5:302020-01-10T15:34:06+5:30
महाविकास आघाडीसंदर्भात अद्याप वरिष्ठांकडून कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नसल्याने धक्कादायक समिकरणाची शक्यताही राजकीय गोटातून वर्तविण्यात येत आहे.
- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषद निवडणुकीत कुण्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसून, सत्ता स्थापनेसाठी संख्याबळाची जूळवाजूळव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह वाशिम जिल्हा जनविकास आघाडी, भारिप-बमसंने हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीसंदर्भात अद्याप वरिष्ठांकडून कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नसल्याने धक्कादायक समिकरणाची शक्यताही राजकीय गोटातून वर्तविण्यात येत आहे.
५२ सदस्य संख्या असलेल्या वाशिम जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी २७ संख्याबळ आवश्यक आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेवर काँग्रेस व राकाँने अपक्षाच्या मदतीने सत्ता उपभोगली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे १२, काँग्रेस ९, भारिप-बमसं ८, भाजपा ७, वाशिम जिल्हा जनविकास आघाडी ७, शिवसेना ६, स्वाभिमानी शेतकरी संघटना १ व अपक्ष दोन असे पक्षीय बलाबल आहे. सत्ता स्थापनेसाठी २७ सदस्य संख्या आवश्यक असून, महाविकास आघाडीचे संख्याबळ २७ असे आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने चुरस निर्माण झाली आहे. सर्वाधिक जागा पटकाविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या रुपात अध्यक्ष पदाचा प्रबळ दावेदार असल्याने, कोणत्याही परिस्थितीत राकाँ अध्यक्षपद सोडणार नाही, असा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमधूनच वर्तविला जात आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला नव्हता. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी हा प्रयोग यशस्वी होणार की नाही याबाबत राजकीय गोटातून साशंकता वर्तविण्यात येत आहे. वरिष्ठ पातळीवर अद्याप महाविकास आघाडीसाठी कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नाहीत, असे राकाँच्या एका जबाबदार पदाधिकाºयाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्षपद व दोन विषय समिती सभापतीपद देऊन उपाध्यक्ष व उर्वरीत दोन सभापती पदे पदरात पाडून घेण्याची खेळी जनविकास आघाडी व भारिप-बमसंकडून होऊ शकते, असेही राजकीय गोटातून बोलले जात आहे. जिल्हा जनविकास आघाडीशी युतीसंदर्भात बोलणी सुरू असल्याचे भारिप-बमसंच्या एका जबाबदार पदाधिकाºयाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. जनविकास आघाडी व भारिप-बमसंला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेस व शिवसेनेकडून ऐनवेळी राकाँशी समझोताही होऊ शकतो, असाही राजकीय अंदाज वर्तविण्यात येत आहे.