Washim ZP Election : कुणालाच स्पष्ट बहूमत नाही; राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 06:40 PM2020-01-08T18:40:36+5:302020-01-08T18:40:44+5:30
काँग्रेस (९), राष्ट्रवादी काँग्रेस (१२) आणि शिवसेना (६) या तीन पक्षांना एकत्र यावे लागणार असल्याची एकंदरित स्थिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : प्रत्येक राजकीय पक्ष स्वबळावर लढलेल्या वाशिमजिल्हा परिषदेच्या ५२ सर्कलचा निकाल बुधवार, ८ जानेवारीला जाहीर झाला. त्यात बहुमतासाठी लागणारा २७ चा फिगर गाठण्यात कुणालाच यश मिळाले नाही. त्यामुळे सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाला असून तो सोडविण्यासाठी काँग्रेस (९), राष्ट्रवादी काँग्रेस (१२) आणि शिवसेना (६) या तीन पक्षांना एकत्र यावे लागणार असल्याची एकंदरित स्थिती आहे.
भाजपाशी काडीमोड घेत शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने महाविकास आघाडी करून राज्यात सत्तास्थापन केली; मात्र हे समीकरण जिल्हा परिषद निवडणूकीत जुळून आले नाही. तीनही पक्षांसह भाजपा, भारिप-बमसं, स्वाभिमानी आणि माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या जनविकास आघाडीने स्वतंत्ररित्या निवडणूक लढली. गतवेळच्या निवडणूकीत सर्वाधिक १७ जागांवर विजय मिळवून जिल्हा परिषदेत काँग्रेस क्रमांक १ चा पक्ष राहिला होता. यावेळी मात्र काँग्रेसला ९ जागांवरच विजय मिळविता आला. राष्ट्रवादी काँग्रेसला गतवेळच्या ८ जागांमध्ये वाढ होत १२ जागांवर विजय मिळाला. भाजपाचे गतवेळी जिल्हा परिषदेत ६ सदस्य होते, यंदा या पक्षाने ७ जागांवर विजय मिळविला. याशिवाय भारिप-बमसंने ९ जागांवर विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले. माजी खासदार देशमुख यांच्या जनविकास आघाडीलाही ६ जागांवर विजय मिळाला; तर स्वाभिमानी पक्षाला एका व अपक्षांना २ जागांवर समाधान मानावे लागले. असे असले तरी स्पष्ट बहुमतासाठी लागणारा २७ चा फिगर कुणाकडेही नाही. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी राज्याच्या सत्तास्थापनेत जुळलेले महाविकास आघाडीचे समीकरण वाशिम जिल्हा परिषदेतही जुळवून आणावे लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.