दिव्यांगांसाठीचा राखीव निधी खर्च करण्यात वाशिम जिल्हा परिषद विभागात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 04:04 PM2018-12-14T16:04:00+5:302018-12-14T16:04:10+5:30
वाशिम : जिल्हा परिषदेच्या स्व-उत्पन्नातील दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेला संपूर्ण निधी खर्च करण्यात अमरावती विभागात वाशिम जिल्हा परिषद अव्वल ठरली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषदेच्या स्व-उत्पन्नातील दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेला संपूर्ण निधी खर्च करण्यात अमरावती विभागात वाशिम जिल्हा परिषद अव्वल ठरली आहे. मार्च २०१९ पूर्वीच खर्च करून ३०० दिव्यांग बांधवांना घरकुल तसेच १७० बचत गटांना फिरते भांडवल उपलब्ध करून दिले आहे.
दिव्यांगांच्या कल्याणासाठी पंचायत राज संस्थांना स्वत:च्या उत्पन्नातून यापूर्वी ३ टक्के निधी खर्च करण्याचा नियम होता. यामध्ये बदल केला असून त्यानुसार हा निधी आता ५ टक्के करण्यात आला आहे. यासाठी जिल्हा परिषदेला स्वतंत्र दिव्यांग कल्याण निधी तयार करावा लागला आहे. हा निधी त्याच वित्तीय वर्षात खर्च करणे बंधनकारक आहे. निधी खर्च न झाल्यास शिल्लक निधी जिल्हा अपंग निधीमध्ये जमा करण्याचे निर्देशही ग्रामविकास विभागाने दिलेले आहेत. यापूर्वी जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींकडून कल्याणकारी योजना राबविल्या जात होत्या. पण काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याने दिव्यांगांना काही योजनांपासून वंचित राहावे लागत होते. दिव्यांगांच्या व्यक्तिगत व सामूहिक विकासाच्या योजनांचे नियोजन करून योजना राबविताना यापूर्वी कानाडोळा झाल्याने वित्तीय वर्ष संपण्यापूर्वी राखीव निधी पूर्णपणे खर्च होत नव्हता. याला कुठेतरी आळा बसावा, या दृष्टिकोनातून सन २०१८-१९ या वर्षात मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना व समाजकल्याण सभापती पानुताई दिलीप जाधव यांनी दिव्यांगांसाठी राखीव असलेला निधी १०० टक्के खर्च करण्याच्या सूचना समाजकल्याण विभागाला दिल्या होत्या. त्या अनुषंगाने नियोजन करीत अंमलबजावणीही करण्यात आली. चालू वर्षात जिल्हा परिषदेच्या स्व-उत्पन्नातील दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेला ४७ लाख रुपये निधी १०० टक्के खर्च करण्यात आला असून सुमारे ३०० दिव्यांग बांधवांना घरकुल तसेच १७० बचत गटांना फिरते भांडवल उपलब्ध करून देण्यात आले. चालू वर्षात दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव असलेला निधी १०० टक्के खर्च करणारी वाशिम जिल्हा परिषद ही अमरावती विभागात अव्वल ठरली आहे, असे जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांनी सांगितले.