‘जय भोले’च्या जयघोषाने दुमदुमली वाशिमनगरी!
By संतोष वानखडे | Published: August 22, 2022 02:38 PM2022-08-22T14:38:19+5:302022-08-22T14:39:04+5:30
Washim : वाशिम शहरासह जिल्हाभरात दरवर्षी कावड यात्रा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. कोरोनाच्या दोन वर्षांत यामध्ये थोडा खंड पडला होता.
वाशिम : श्रावण महिन्यातील चवथ्या सोमवारी (दि.२२) शिवभक्तांची कावड यात्रा ‘हर हर महादेव, बम बम भोले’च्या जयघोषात वाशिम नगरीत दाखल झाली. ‘जय भोले’च्या जयघोषाने वाशिमनगरी दुमदुमन गेली.
वाशिम शहरासह जिल्हाभरात दरवर्षी कावड यात्रा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. कोरोनाच्या दोन वर्षांत यामध्ये थोडा खंड पडला होता. यंदा कोरोनाचे सावट नसल्याने आणि कोणतेही निर्बंध नसल्याने श्रावण उत्सव मोठ्या हर्षोल्हासात साजरा केला जात आहे. वाशिम शहरासह रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा या प्रमुख शहरांत श्रावण सोमवारी नदी, तिर्थक्षेत्रावरील जल कावडीने आणून महादेवाला जलाभिषेक करण्यात येतो.
श्रावण महिन्यातील चवथ्या सोमवारी ढोल ताशांचा गजरात हर्र हर्र बोला महादेवाचा जयघोष करीत कावड यात्रेचे वाशिमनगरीत सकाळीच आगमन झाले. शिवभक्तांसह लहान मुलांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. कावड यात्रा पाहण्यासाठी शहरात मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. ठिकठिकाणी शिवभक्तांना चहा, पाणी, नाष्टा, फळ वाटप करण्यात आले. तसेच कावड यात्रेला विविध मान्यवरांनी भेट दिली आणि शिवभक्तांच्या उत्साहात भर घातली.