वाशिमात महायुती; मानोऱ्यात महाविकास आघाडीची सरशी!
By संतोष वानखडे | Published: April 29, 2023 06:13 PM2023-04-29T18:13:22+5:302023-04-29T18:13:36+5:30
सुरूवातीला सेवा सहकारी संस्थेच्या महिला राखीव, विमुक्त/भटक्या जाती व इतर मागासवर्ग या तिन्ही मतदारसंघातील निकाल संमिश्र आल्याने ‘क्राॅस वोटिंग’ झाल्याचे अधोरेखीत झाले.
वाशिम : वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा गोटे घराण्यावर विश्वास दाखवत काॅंग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे), वंचित बहुजन आघाडी व मित्र पक्ष (महायुती) प्रणित शेतकरी विकास पॅनलच्या १५ पैकी ९ उमेदवारांना निवडून दिले तर मानोऱ्यात महाविकास आघाडीला स्पष्ट कौल दिला.
जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांपैकी वाशिम आणि मानोरा या दोन कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८ एप्रिल रोजी ३,९९८ मतदारांपैकी ३८६८ जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. वाशिम बाजार समितीत काॅंग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे), वंचित बहुजन आघाडी व मित्र पक्ष (महायुती) प्रणित शेतकरी विकास पॅनल आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेनेचा (उद्धव ठाकरे) दुसरा गट प्रणित शेतकरी सहकारी पॅनलच्या उमेदवारांत थेट लढत झाली. शनिवार, २९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजतापासून वाशिम व मानोरा येथे मतमोजणीला प्रारंभ झाला. सुरूवातीला सेवा सहकारी संस्थेच्या महिला राखीव, विमुक्त/भटक्या जाती व इतर मागासवर्ग या तिन्ही मतदारसंघातील निकाल संमिश्र आल्याने ‘क्राॅस वोटिंग’ झाल्याचे अधोरेखीत झाले.
शेतकरी विकास पॅनलचे सुभाष राठोड व सविता गजानन काटेकर तर शेतकरी सहकारी पॅनलच्या रेखा सुरेश मापारी व प्रमिला रामचंद्र इढोळे विजय झाल्या. सेवा सहकारी संस्थेच्या सर्वसाधारण मतदारसंघातील सात जागेपैकी शेतकरी विकास पॅनलचे राजू चौधरी, महादेव काकडे, दत्ता गोटे, नथ्थुजी कापसे, दामोदर गोटे व गोवर्धन चव्हाण असे सहा उमेदवार विजयी झाले तर शेतकरी सहकारी पॅनलचे सुभाष चौधरी विजयी झाले. ग्रामपंचायतच्या चार जागेपैकी शेतकरी सहकारी पॅनलचे आशा संजय मापारी, विनोद पट्टेबहादूर, नंदकिशोर भोयर असे तीन उमेदवार विजयी झाले तर शेतकरी विकास पॅनलचे चरण गोटे विजयी झाले. आडते व व्यापारी मतदारसंघातून सुरेश भोयर व सारीका नितीन करवा विजयी झाले तर हमाल व मापारी मतदारसंघातून हिरा जानीवाले विजयी झाले.
मानोरा बाजार समितीत मतदारांनी महाविकास आघाडीला स्पष्ट कौल देत १८ पैकी तब्बल १६ उमेदवार निवडून दिले. दुसरीकडे भाजपा प्रणित शेतकरी पॅनलला केवळ दोन तर शिवसेनेच्या खासदार भावना गवळी, युवक काॅंग्रेसचे अमोल तरोडकर, विनोद चव्हाण यांच्या पॅनलला खातेही उघडता आले नाही.