संचारबंदीला वाशिमकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:38 AM2021-03-08T04:38:23+5:302021-03-08T04:38:23+5:30
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी संचारबंदीच्या आदेशाला ८ मार्चपर्यंत ...
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी संचारबंदीच्या आदेशाला ८ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आठवडाअखेर शनिवारी सायंकाळी ५ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत संचारबंदी असून, या दरम्यान जिल्ह्यातील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. यामधून दवाखाने, मेडिकल्स, दुग्ध विक्रेते / डेअरी, प्रवासी वाहतूक व ऑटो वाहतूक आदींना वगळण्यात आले. शनिवार, ६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून लागू झालेल्या संचारबंदीत रविवार, ७ मार्च रोजी दिवसभर जिल्ह्यातील संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. वाशिमसह रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर व मानोरा शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत सर्व दुकाने बंद होती. दरम्यान, प्रवाशी वाहतूक सुरू असल्याने रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहनांचा प्रवासही सुसाट असल्याचे पाहावयास मिळाले.
००००
प्रमुख शहरांमध्ये शुकशुकाट
संचारबंदी आदेशाचे पालन म्हणून वाशिम, रिसोड, मालेगाव, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर या प्रमुख शहरांसह शेलुबाजार, अनसिंग, शिरपूर, कामरगाव, धनज, शेंदुरजना अढाव, मेडशी, रिठद आदी गावांमधील बाजारपेठ कडकडीत बंद असल्याने शुकशुकाट दिसून आला.