बाजारपेठेतील चैतन्यामुळे वाशिमचे अर्थकारण रुळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 11:05 AM2021-06-10T11:05:39+5:302021-06-10T11:05:45+5:30
Business in Washim : व्यापार पूर्वपदावर येत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचा सूर असून लवकरच वाशिमचे अर्थकारण रुळावर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : काेराेना संसर्गाचा प्रकाेप दिवसेंदिवस कमी हाेत असल्याने प्रशासनाने कडक निर्बंधांत शिथिलता दिल्याने पुन्हा एकदा बाजारपेठ गजबजल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या वातावरणात व्यापार पूर्वपदावर येत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचा सूर असून लवकरच वाशिमचे अर्थकारण रुळावर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जीवघेण्या काेराेना विषाणूचा प्रकाेप पुन्हा वाढल्यामुळे शासनाने कडक निर्बंध लागू केले हाेते. या निर्बंधांचे पालन व्हावे,यासाठी जिल्हा प्रशासन आग्रही हाेते. काेराेन विषाणूची साखळी खंडित करण्याच्या उद्देशातून सर्व उद्याेग, व्यवसाय बंद ठेवण्याचे प्रशासनाचे निर्देश हाेते. काेराेनाची लाट ओसरू लागल्याचे दिसताच शासनाने बाजारपेठ सुरु करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे शहरातील बाजारपेठ पुन्हा गजबजून गेली असून नागरिक विविध साहित्य खरेदीसाठी गर्दी करीत असल्याचे चित्र आहे. जून महिन्यात काेराेना संसर्ग कमी हाेत असल्याने बाजारपेठ पूर्ववत हाेत असल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेतील उलाढाल व व्यवसायाबाबत माहिती जाणून घेतली असता बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण कायम राहावे याकरिता व्यापाऱ्यांकडून नियमांचे पालन करण्याबाबत खबरदारी घेण्यात येत आहे. काेराेनाचा प्रादूर्भाव अद्याप कायम असल्यामुळे नागरिकांनी देखील नियमांचे पालन करून बाजारपेठेत खरेदीसाठी यावे,असे आवाहन व्यापारी वर्गांतून केले जात आहे.
काेराेना संसर्गामुळे सर्वच व्यापार, उद्याेगांवर परिणाम झाला आहे. काेराेनाचा संसर्ग कमी हाेत आहे, आता हा पुन्हा वाढू नये याकरिता सर्वांनी खबरदारी घेऊन व्यवसाय, धंदे वृद्धिंगत हाेत राहावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. व्यवसायास सुरुवात झाली असून, पूर्वपदावर येत आहेत.
-जुगलकिशाेर काेठारी,
जिल्हाध्यक्ष, व्यापारी मंडळ