‘फ्लेमिंगो’च्या पसंतीला उतरले वाशिमचे एकबुर्जी!
By Admin | Published: November 11, 2015 01:50 AM2015-11-11T01:50:06+5:302015-11-11T01:50:06+5:30
पक्षिमित्रांना पर्वणी ; वाशिमला सहा महिन्यांचा मुक्काम.
सुनील काकडे / वाशिम : देशाच्या पश्चिमेकडे असलेल्या गुजरातमधील कच्छच्या वाळवंटात प्रजननप्रक्रिया आटोपल्यानंतर हिवाळ्याच्या दिवसांत खाद्याच्या शोधार्थ दक्षिणेकडे प्रवास करणारा ह्यफ्लेमिंगोह्ण पक्षी वाशिममधील एकबुर्जी प्रकल्पावर सहा महिन्यांच्या मुक्कामाला येतो. विदर्भातील एकमेव एकबुर्जी प्रकल्प हे या पक्ष्याचे आवडते स्थळ असून, लवकरच पक्षिमित्रांना फ्लेमिंगोचे बारकाईने निरीक्षण करण्याची पर्वणी मिळणार आहे. वाशिमचे पक्षिवैभव अत्यंत समृद्ध आहे. येथे अनेक प्रजातींचे पक्षी आढळतात. विशेष म्हणजे, वाशिम शहर परिसर विदेशातून भारतात स्थलांतर करणार्या पक्ष्यांच्या सरळ रेषेवर असल्यामुळे येथे अनेक दुर्मीळ स्थलांतरित पक्षी पाहायला मिळतात. वाशिममध्ये तणमोर हा दुर्मीळ पक्षी आढळतो. वाशिम जिल्ह्यात युरोप, सायबेरिया, मंगोलिया यांसह विविध देशांतून अनेक पक्षी स्थलांतर करतात. यामध्ये प्रामुख्याने विदर्भात कुठेच वास्तव्य न करणारा फ्लेमिंगो हा पक्षी शहराला पाणीपुरवठा करणार्या एकबुर्जी प्रकल्पावर हिवाळ्यातील नोव्हेंबर ते एप्रिल असे सहा महिने वास्तव्याला असतो. गुजरातमधील कच्छच्या वाळवंटात प्रजननप्रक्रिया आटोपल्यानंतर नोव्हेंबरच्या सुरुवातीला मुंबईची खाडी, पैठण येथील जायकवाडी धरण तसेच पुणे जिल्ह्यातील उजनी धरणावर फ्लेमिंगो हा पक्षी हजारोंच्या संख्येने वास्तव्याला असतो. सोबतच विदर्भातील एकमेव वाशिम येथील एकबुर्जी प्रकल्पावरही याच काळात त्याचे वास्तव्य असते. एकबुर्जीवर गतवर्षी सुमारे १५६ फ्लेमिंगो पक्ष्यांची नोंद घेण्यात आली होती.