भारत-चीन सीमेवर वाशिमचा जवान अमोल गोरे शहीद; शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
By नंदकिशोर नारे | Published: April 18, 2023 08:01 PM2023-04-18T20:01:27+5:302023-04-18T20:27:58+5:30
पाण्यात वाहून जाणाऱ्या सहकाऱ्यांना वाचवताना वीरमरण.
वाशिम : भारत-चीन सीमेवर अरुणाचल प्रदेशात वापरी यांग बुंग नाला इस्ट कामेंग येथे सहकाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वाशिम तालुक्यातील सोनखास येथील पॅरा कमांडो अमोल तानाजी गोरे या भारतीय जवानाला वीरमरण आले. ही वार्ता कळताच जिल्हाभरातून शोक संवेदनांसह अमोलला श्रद्धांजली वाहिली जात आहे.
पॅरा कमांडो अमोल गोरे आणि त्यांचे दोन सहकारी जवान चीन सीमेवर गस्तीवर असताना अरुणाचल प्रदेशातील कांमेंग व्हॅली येथे मुसळधार पाऊस आणि वेगाने वारे वाहत होते. यादरम्यान पाण्याचा मोठा प्रवाह त्यांच्या दिशेने आला. या प्रवाहात अमोल व त्याचे दोन सहकारी जवान वाहून जात असताना अमोलने जिवाची पर्वा न करता त्यांना पाण्याच्या प्रवाहातून वाचवण्याचा प्रयत्न केला.
त्यात आपल्या दोन सहकारी जवानांना वाचविण्यात त्याला यश आले. मात्र, या प्रयत्नात अमोलच्या डोक्याला पाण्याच्या प्रवाहातील एक मोठा दगड लागल्याने तो गंभीर जखमी झाला. यातच अमोल गोरेला वीरमरण आले. अमोलच्या पश्चात पत्नी वैशाली, दोन मुले, शेतकरी असलेले वडील तानाजी गोरे, आई, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे.
२०१० मध्ये झाला होता सैन्यात दाखल
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अमाेलला देशसेवेची ओढ होती. त्यासाठी खडतर परिश्रम घेत सन २०१९ मध्ये अमोल भारतीय सैन्यात भरती झाला होता. अमोलचे लग्न वैशाली यांच्याशी सन २०१६ मध्ये झाले. अमोलने सैन्यात असताना पोहण्याचे प्रशिक्षणही घेतले होते. तो पोहण्यात तरबेज होता.
आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
अमोलचे पार्थिव आज रात्री २ वाजता विमानाने गुवाहाटी येथून पुणे येथे पोहोचणार आहे. पुणे येथे पोहोचताच त्याला सैन्याच्या वतीने मानवंदना दिल्यानंतर लष्कराच्या वाहनाने अमोलचे पार्थिव वाशिम तालुक्यातील सोनखास येथे १९ एप्रिल रोजी सकाळी पोहोचणार आहे. शहीद अमोल गोरेवर सकाळी ८ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
२४ एप्रिलला येणार होता सुटीवर
गेल्या ३ ते ४ महिन्यांपूर्वी अमोलची अरुणाचल प्रदेशात पोस्टिंग झाली होती. तो २४ एप्रिल रोजी सुटीवर घरच्या मंडळींच्या भेटीसाठी येणार होता. तत्पूर्वीच त्याला वीरमरण आल्याने परिवाराची भेट घेण्याची त्याची इच्छा अधुरीच राहिली. अमोलसारखा धाडसी व मनमिळाऊ जवान शहीद झाल्याने संपूर्ण वाशिम जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.