वाशिमच्या दोघांनी केली आर्वीच्या महिलेची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:33 AM2021-01-14T04:33:37+5:302021-01-14T04:33:37+5:30
आर्वी येथील संजय नगर येथे वास्तव्यास असलेल्या अर्चना परेशकुमार लोखंडे हिने महिला बालविकास अधिकारी पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा ...
आर्वी येथील संजय नगर येथे वास्तव्यास असलेल्या अर्चना परेशकुमार लोखंडे हिने महिला बालविकास अधिकारी पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. परीक्षेत उर्त्तीर्ण उमेदवारांची यादी जाहीर होण्यापूर्वी बबन देवकते व वैभव बबन देवकते (दोघेही रा. तिरुपती सिटी, वाशिम) यांनी अर्चना हिला मोबाईलवरून संपर्क करून ज्या पदासाठी अर्ज केला त्यासाठी तुम्हाला नोकरी लावून देतो, अशी बतावणी केली. दोन्ही आरोपी महिलेच्या भेटीसाठी आर्वी येथे त्यांच्या घरीसुद्धा गेले होते. शासकीय नोकरी लावण्यासाठी त्यांनी तब्बल सहा लाख रुपयांची मागणी केली होती. दरम्यान, अॅडव्हान्स म्हणून अर्चनाकडून २९ हजार ५०० रुपये रोख घेतले. माझी मंत्र्यांसोबत ओळख आहे असे म्हणून मंत्र्यांसोबतचे फोटोही दाखविले. त्यामुळे अर्चनाचा विश्वास अधिक पक्का झाला. अर्चना हिने त्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने १ लाख ७५ हजार रुपये जमा केले.
परीक्षेचा निकाल लागल्यावर अर्चनाचे नाव यादीत न आल्यामुळे तिने देवकते यांना फोन करून माहिती घेतली असता देवकते म्हणाले की, दुसऱ्या यादीमध्ये तुमचा नंबर लागेल. उर्वरित रक्कम मला ताबडतोब पाठवा. असे म्हटल्यानंतर आपली फसवणूक झाल्याची बाब अर्चनाच्या लक्षात आली. त्यानंतर अर्चना व तिच्या नातेवाईकांनी देवकते यांना पैसे परत मागितले असता त्यांनी पैसे परत केले नाही आणि आपले मोबाईल बंद ठेवले.
याप्रकरणी अर्चनाचे नातेवाईक दिलीप पोटफोडे यांनी आर्वी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविली. आर्वी पोलिसांनी बबनराव देवकते व वैभव बबनराव देवकते (दोघेही रा. तिरुपती सिटी, वाशिम) या दोघांविरुद्ध भादंवि कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.