वाशिम जिल्हा परिषदेच्या तीन हजार शिक्षकांना मिळाले वेतन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 02:53 PM2019-05-26T14:53:30+5:302019-05-26T14:53:49+5:30
वाशिम : जिल्हा परिषद शाळांवरील जवळपास तीन हजार शिक्षकांना एप्रिल व मे या दोन महिन्याचे प्रलंबित वेतन मिळाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषद शाळांवरील जवळपास तीन हजार शिक्षकांना एप्रिल व मे या दोन महिन्याचे प्रलंबित वेतन मिळाले आहे. दोन महिन्यांचे वेतन थकित असल्यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधले होते, हे विशेष.
वाशिम जिल्हा परिषदेंतर्गत सहा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ७५० पेक्षा अधिक शाळांवर जवळपास तीन हजार शिक्षक कार्यरत आहेत. या शिक्षकांना फेब्रुवारी महिन्याचा अपवाद वगळता उर्वरीत एप्रिल व मे अशा दोन महिन्यांचे वेतन मिळाले नव्हते. ऐन लग्नसराईच्या काळात दोन महिन्याचे वेतन प्रलंबित असल्याने शिक्षकांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला होता. वैयक्तिक कामासांठी काढले कर्ज, गृहकर्ज, उसणवारीचे हफ्तेही त्यामुळे रखडले होते. प्रलंबित वेतन देण्याची मागणी विविध शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग तसेच लेखा व वित्त विभागाकडे केली होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून लेखा व वित्त विभागाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत २१ ते २४ मे या दरम्यान सहाही पंचायत समितींतर्गत येणाºया शिक्षकांचे दोन महिन्यांचे प्रलंबित वेतन अदा करण्यात आले आहे. दोन महिन्यांचे वेतन मिळाल्याने शिक्षकांमधून आनंद व्यक्त होत आहे.