वाशिम जिल्हा परिषदेची विविध देयके रखडली !
By admin | Published: March 20, 2017 07:19 PM2017-03-20T19:19:26+5:302017-03-20T19:19:26+5:30
१५ मार्चपासून लेखणी बंद आंदोलन पुकारल्याने वाशिम जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची देयके रखडली आहेत.
वाशिम : विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी जिल्हा परिषद लेखा संवर्गीय कर्मचाऱ्यांनी १५ मार्चपासून लेखणी बंद आंदोलन पुकारल्याने वाशिम जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची देयके रखडली आहेत. अद्यापही आंदोलनावर तोडगा निघाला नसल्याने रखडलेल्या देयकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. लेखा कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे ग्रेड पे वरिष्ठ सहाय्यक लेखा कर्मचाऱ्यांना ४०० रुपये व सहाय्यक लेखा अधिकारी यांना १०० रुपये वाढवून मिळावा, ग्रेड पे राज्य शासन कर्मचाऱ्यांना ज्या दिनांकापासून मंजूर करण्यात आला, त्या दिनांकापासून मंजूर करण्यात यावा व यात झालेला भेदभाव संपुष्टात आणावा, जिल्हा कोषागार व उपकोषागार कार्यालयाप्रमाणे गट स्तरावर लेखा विभागाचे कामकाज करण्यात यावे यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लेखा संवर्गातील संपूर्ण कर्मचारी लेखणी बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. यामुळे विविध विभागांची देयके, लेखाविषयक कामकाज ठप्प आहे. आंदोलनावर लवकर तोडगा निघाला नाही तर मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित राहण्याची शक्यता आहे.