वाशिममध्ये १९९ विहिरींचे अधिग्रहण !
By admin | Published: April 9, 2017 02:14 PM2017-04-09T14:14:20+5:302017-04-09T14:14:20+5:30
संभाव्य पाणीटंचाईवर तात्पुरती उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १९९ गावांत १९९ विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे.
वाशिम - संभाव्य पाणीटंचाईवर तात्पुरती उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १९९ गावांत १९९ विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. एप्रिल महिन्यापासून पाणीटंचाईची तिव्रता लक्षात घेता त्या-त्या गावात विहिर अधिग्रहण केले जात आहे, अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता नीलेश राठोड यांनी दिली.
यावर्षी जिल्ह्यातील २६६ गावांत पाणीटंचाई जाणवणार असल्याचा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. पाणीटंचाईग्रस्त गावांत पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यासाठी कृती आराखड्यातील उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. सुरूवातीला तीव्र पाणीटंचाई जाणवणाऱ्या गावांमध्ये, जलसाठा असलेल्या विहिरींचे अधिग्रहण करून गावकऱ्यांना पाणी पुरविले जाणार आहे. वाशिम तालुक्यातील ३५ गावांत ३५ विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. याप्रमाणे मालेगाव तालुक्यात ४० गावांमध्ये ४० विहिर अधिग्रहण, रिसोड तालुक्यात ४० गावांत ४० विहिर अधिग्रहण, मंगरूळपीर तालुक्यात २२ गावांत २२ विहिर अधिग्रहण, मानोरा तालुक्यात २५ गावांत २५ आणि कारंजा तालुक्यात ३७ गावांत ३७ अशा एकूण १९९ गावांत १९९ विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. पाणीटंचाईग्रस्त गावांत विहिर अधिग्रहण करण्याची कार्यवाही सुरू झाली.