वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाईतच पाण्याचा अपव्यय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 03:17 PM2019-03-03T15:17:25+5:302019-03-03T15:17:30+5:30
वाशिम : जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट गडद असून, मार्चच्या सुरूवातीलाच अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे पाणीपुरवठा योजनेंतर्गतच्या काही पाईपलाईनला लिकेज असल्याने पाण्याचा मोठा प्रमाणात अपव्यय होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट गडद असून, मार्चच्या सुरूवातीलाच अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे पाणीपुरवठा योजनेंतर्गतच्या काही पाईपलाईनला लिकेज असल्याने पाण्याचा मोठा प्रमाणात अपव्यय होत आहे. लिकेज शोधून त्याची दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
सन २०१८ मध्ये पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने सध्या जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांत सरासरी २३ टक्के जलसाठा असतानाही काही प्रकल्पांमधून पाण्याचा अवैध उपसा होत आहे. तसेच काही पाणीपुरवठा योजनेतील पाईपलाईन व व्हॉल्वला लिकेज असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. एकीकडे पाणीटंचाईच्या दाहकतेत सर्वसामान्य जनता होरपळून निघत असतानाच, दुसरीकडे मात्र संबंधित अधिकारी-कर्मचाºयांच्या नियोजनशून्य कारभारामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. शिरपूरनजीकच्या अडोळ प्रकल्पातून रिठद, शिरपूर, रिसोड शहराला पाणीपुरवठा करणाºया योजनेंतर्गतच्या व्हॉल्वमधून पाण्याचा अपव्यय होत आहे. याकडे संबंधित यंत्रणेच्या अधिकारी-कर्मचाºयांचे लक्ष कसे जात नाही? अशा संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटत आहेत. पाणीटंचाई निवारणार्थ कोट्यवधी रुपयांचा कृती आराखडा राबविला जातो. सर्वसामान्यांची तहान भागविण्यासाठी पाण्यासारखा पैसा योजनांवर ओतला जात आहे. तरीदेखील सर्वसामान्यांचा घसा कोरडाच राहत असल्याची परिस्थिती जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आहे. जिल्ह्यातील ५०० पेक्षा अधिक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवणार असल्याचे कृती आराखड्यातून दिसून येते. पाणीटंचाईची तिव्रता कमी करण्यासाठी लिकेजची दुरूस्ती करणे आवश्यक ठरत आहे.