‘मिनी बीडीओं’चा ग्रामपंचायतींवर ‘वॉच’
By Admin | Published: May 24, 2017 01:56 AM2017-05-24T01:56:27+5:302017-05-24T01:56:27+5:30
जिल्हा परिषद सर्कलनिहाय ५१ मिनी बीडीओ : दर बुधवारी घेणार ग्रामसेवकांचा आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ग्रामपंचायतींच्या कामकाजावर देखरेख व कामकाजात सुसूत्रता आणण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद सर्कलनिहाय मिनी बीडीओंची नियुक्ती प्रक्रिया पुर्णत्वाकडे नेली आहे. कार्यरत विस्तार अधिकारी, कृषी अधिकारी, पर्यवेक्षक आदी अधिकाऱ्यांनाच मिनी बीडीओचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला आहे.
ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेमार्फत पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतींचा विकास साधण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जातो. या निधीचा योग्य ठिकाणी वापर व्हावा, शासकीय योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवाव्यात, लोकांच्या तक्रारींचा निपटारा तातडीने व्हावा, वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांचा आढावा जिल्हा परिषद सर्कल स्तरावर घेता यावा, आदी दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेने ‘सर्कलनिहाय मिनी बीडीओ’ या संकल्पनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. जिल्ह्यात ५१ जिल्हा परिषद सर्कल असून, प्रत्येक सर्कलला एक याप्रमाणे ५१ मिनी बीडीओंची नियुक्ती करण्यात आली आहे. गटविकास अधिकाऱ्यांच्या अधिनस्त कार्यरत विस्तार अधिकारी संवर्गातील सर्व कृषी अधिकारी, पंचायत विस्तार अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, विस्तार अधिकारी (सांख्यिकी), आरोग्य पर्यवेक्षक व इतर संबंधित संवर्गातील अधिकाऱ्यांना मिनी बीडीओचा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला आहे. वाशिम, रिसोड व मालेगाव तालुक्यात प्रत्येकी नऊ आणि कारंजा, मंगरूळपीर व मानोरा तालुक्यात प्रत्येक आठ असे एकूण ५१ मिनी बीडीओ ४९१ ग्रामपंचायतींच्या कामकाजावर वॉच ठेवणार आहेत. त्या-त्या सर्कल क्षेत्रात विविध योजनांची अंमलबजावणी व सनियंत्रण करण्याचे अधिकार मिनी बीडीओला देण्यात आले आहेत. प्रशासकीय व आर्थिक अधिकार वगळता अन्य सर्व प्रकारचे अधिकारही मिनी बीडीओंना मिळाले आहेत.