संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांचा ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 03:52 PM2017-10-02T15:52:24+5:302017-10-02T15:52:24+5:30
वाशिम - जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. मतदानादरम्यान कुठेही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची माहिती घेतली जात आहे. या केंद्रांवर विशेष वॉच ठेवला जाणार आहे.
आगामी आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असल्याने जिल्ह्यातील २७३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक ७ आॅक्टोबर रोजी होत आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील ५१ ग्राम पंचायती, कारंजा तालुक्यातील ५३, मालेगाव तालुक्यातील ४८, रिसोड तालुक्यातील ४५, मानोरा तालुक्यातील ४१ आणि मंगरूळपीर तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ग्रामपंचायत निवडणुकीने ग्रामीण भागातील राजकारण चांगलेच तापविले आहे. प्रचाराचा उडत असलेला धुराळा ५ आॅक्टोबर रोजी सायंकाळनंतर आचारसंहितेमुळे ‘शांत’ होणार आहे. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याच्या कामात उमेदवार व्यस्त असल्याचे दुसरीकडे स्थानिक कार्यकर्ते व उमेदवारांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनू नये म्हणून जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा उपद्रवी व संवेदनशील मतदान केंद्रांची चाचपणी करण्यात व्यस्त असल्याचे दिसून येते. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. या मतदान केंद्राबाहेर कुणालाही थांबू न देणे, चित्रिकरण करणे यासह इतर उपाययोजना केल्या जाणार आहेत.