वृक्षारोपणाच्या खड्ड्यांवर पथकाचा ‘वॉच’!
By admin | Published: May 19, 2017 01:03 AM2017-05-19T01:03:05+5:302017-05-19T01:03:05+5:30
वाशिम जिल्हा परिषद : ३.८६ लाखांचे उद्दिष्ट, ९४ हजार खड्डे खोदले
संतोष वानखडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गंत तीन लाख ८६ हजाराच्या वर वृक्षारोपण केले जाणार आहे. वृक्षारोपणासाठी संबंधित विभागाने खड्डे खोदले किंवा नाही याची पडताळणी करण्यासाठी जिल्हा परिषदेने पथक गठित केले आहे.
५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत वृक्ष लागवड केली जाणार आहे. वाशिम जिल्ह्याला ५ लाख ८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून, यापैकी तीन लाख ८६ हजार वृक्ष लागवड जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमार्फत केली जाणार आहे. पंचायत विभागातर्फे प्रत्येक ग्रामपंचायतीला ७५० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. १ ते ७ जुलै दरम्यान वृक्ष लागवड केली जाणार असल्याचे आतापासूनच वृक्षारोपणासाठी खड्डे खोदण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी केल्या आहेत. १७ मे पर्यंत एकूण ९४ हजार ३५० खड्डे खोदण्यात आले. देखभाल दुरूस्ती व संरक्षणासाठी ग्रामपंचायतीच्या ताब्यात असणाऱ्या ई-क्लास जमिनीवरही वृक्ष लागवड केली जाणार आहे.
वृक्षारोपणासाठी संबंधित यंत्रणेने खड्डे खोदले किंवा नाही, यावर देखरेख म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कक्षाचे गटविकास अधिकारी रुपेश निमके यांच्या नेतृत्वाखाली एक पथक गठीत केले आहे. सदर पथक ग्रामपंचायतींना अचानक भेटी देऊन पाहणी करणार आहे.