मिर्झापूर प्रकल्पातून सोडले अडोळ नदीत पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 04:36 PM2018-11-18T16:36:14+5:302018-11-18T16:36:21+5:30
शिरपूर जैन (वाशिम) : चालूवर्षीच्या जून महिन्यात घळभरणी पूर्ण झालेल्या मिर्झापूर सिंचन प्रकल्पात यंदा मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम) : चालूवर्षीच्या जून महिन्यात घळभरणी पूर्ण झालेल्या मिर्झापूर सिंचन प्रकल्पात यंदा मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला आहे. त्याचा रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी फायदा व्हावा, या उद्देशाने जलसंपदा विभागाने प्रकल्पातील पाणी अडोळ नदीत सोडून ते पिकांना पुरविण्यात येत आहे. यामाध्यमातून तीन गावांना पाणी मिळाले असून प्रत्यक्ष प्रकल्पातून दोन गावांना पाणी उपलब्ध झाले आहे.
शिरपूर परिसरातील शिरपूर, मिर्झापूर, दुधाळा, पांगरखेडा, वाघी बु. आदी गावांमधील शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळत नसे. ही बाब लक्षात घेवून शिरपूरपासून ३ किलोमिटर अंतरावर मिर्झापूर सिंचन प्रकल्प उभारण्यात आला. त्याचे काम चालूवर्षीच्या जून महिन्यात पूर्ण होवून प्रकल्पात ६५ टक्के जलसाठा झाला. दरम्यान, या प्रकल्पातील पाणी थेट शेतकºयांना सिंचनासाठी मिळावे, यासाठी अडोळ नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. यामुळे दुधाळा, वाघी आणि शिरपूर येथील काही शेतकºयांच्या सिंचनाची सोय झाली आहे; तर मिर्झापूर, घाटा आणि पांगरखेडा या गावांमधील शेतकरी थेट प्रकल्पातून पाणी उपसा करित आहेत.
कालव्याचे काम पूर्ण झाल्यास ६१० हेक्टर जमीन येणार सिंचनाखाली!
मिर्झापूर सिंचन प्रकल्पातून साधारणत: ४ किलोमिटर अंतराचा डावा कालवा तयार करण्याची बाब प्रस्तावित आहे. त्यासाठी शेतकºयांनी जमिनी देखील दिल्या. मात्र, या कालव्याचे काम अर्धवट असल्याने यंदा त्याव्दारे सिंचनासाठी पाणी मिळणे अशक्य झाले आहे. जलसंपदा विभागाने प्रलंबित असलेले हे काम पूर्ण केल्यास साधारणत: ६१० हेक्टर शेतजमिन सिंचनाखाली येणार आहे.