विभागीयस्तरावर जलदूत, जलप्रेमींना जलसंधारणाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 12:42 PM2020-02-29T12:42:27+5:302020-02-29T12:44:02+5:30
जलदूत, जलनायक आणि पर्यावरण तज्ञांनी जलसंधारणाबाबत मुलभूत आणि अत्यावश्यक उपाययोजनांबाबत विभागातील प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
वाशिम: पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास परिषद प्रबोधनीच्यावतीने राज्यातील भूजल पातळीची स्थिती आणि जलसंधारणाबाबत जलदूत, जलप्रेमींना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या अंतर्गत अमरावती येथे २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत शासनाच्या जलचळवळीत कार्यरत जलदूत, जलनायक आणि पर्यावरण तज्ञांनी जलसंधारणाबाबत मुलभूत आणि अत्यावश्यक उपाययोजनांबाबत विभागातील प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
अमरावती येथे आयोजित कार्यशाळेत २५ फेब्रुवारी रोजी जलदूत दिलिप काळे यांनी पाण्याचे महत्त्व व जलसाक्षरता कशासाठी या विषयावर सहभागी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले, तर दुपारच्या सत्रात जलसंधारण करण्याची कारणे आणि उपाय यावर गजानन काळे यांनी मार्गदर्शन केले, सायंकाळच्या सत्रा संजय कराड यांनी भुरचना शास्त्रबाबत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी अमरावती विद्यापीठ परिसर अभ्यास दौरा करून श्रमदान करण्यात आले,तसेच दुपारच्या सत्रात अरविंद कडबे यांनी जलप्रदुषण, सेंद्रिय शेतीच्या विविध पद्धतीबाबत मार्गदर्शन केले, तर सायंकाळी किरण हातगावकर यांनी पाणी वाटप संस्थांची कार्ये आणि आवश्यक तेवर प्रकाश टाकला. २७ फेबु्रवारी रोजी राज्याचे जलनायक तथा पर्यावरण तज्ज्ञ डॉ निलेश हेडा यांनी सकाळच्या सत्रात जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनासाठी नदी खोरे समजून घेणे किती आवश्यक आहे, या विषयावर मार्गदर्शन केले, तर दुपारच्या सत्रात जलदूत रविंद्र इंगोले यांनी पाण्याच्या ताळेबंदाबाबत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. सायंकाळच्या सत्रात कार्यशाळेचे मुल्यमापन व चर्चा करण्यात आली. या कार्यशाळेत विभागातील ६० पेक्षा अधिक जलदूत आणि जलप्रेमीनी सहभाग घेतला होता.
जलसंधारणासाठी राज्य शासनाच्यावतीने विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत राज्यभरात जलप्रेमींना जलसाक्षरतेचे धडे देण्यात येत आहेत. यासाठी राज्यस्तरापासून गावस्तरापर्यंत मार्गदर्शक म्हणून जलनायक, जलदुतांची निवड करण्यात आली आहे.
-डॉ. निलेश हेडा
राज्य जलनायक, तथा पर्यावरण तज्ज्ञ