कारंजा तालुक्यात १०० हेक्टर क्षेत्रावर जलसंधारणाची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 05:50 PM2018-11-28T17:50:12+5:302018-11-28T17:50:20+5:30
कारंजा तालुक्यात १०० हेक्टर क्षेत्रावर जलसंधारणाची कामे केली जात असून, या अभियानाचा अधिकाधिक गावांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक विशाल नागनाथवार यांनी मोखड येथील कार्यक्रमात केले.
सुजलाम, सुफलाम अभियान : अभियानात सहभागी होण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : महाराष्ट्र शासन जलसंधारण विभाग व भारतीय जैन संघटना यांच्यावतीने जिल्हयात सुजलाम सुफलाम वाशिम अभियान राबविणे सुरू आहे. या अभियानातंर्गत कारंजा तालुक्यात १०० हेक्टर क्षेत्रावर जलसंधारणाची कामे केली जात असून, या अभियानाचा अधिकाधिक गावांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक विशाल नागनाथवार यांनी मोखड येथील कार्यक्रमात केले.
ग्राम मोखड येथे कृषी विभागामार्फत समतल चर खोदकाम काम सुरू आहे. या कामाची पाहणी सुजलाम सुफलाम दुष्काळ मुक्त अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक विशाल नागनाथवार यांनी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शेख तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसन्न ताठे, सुनिल श्रीवास्तव, भारजीय जैन संघटनचे प्रदीप जैन, तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके, जिल्हा निरीक्षक अभिलाष नरोडे, वाशिम तालुका समन्वयक श्याम भुसेवार, कृषी सहायक मार्गे यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा व्यवस्थापक विशाल नागनाथवार यांनी या अभियानाची सविस्तर माहिती दिली. शेतक-यांना धरणातील सुपिक गाळ घेउन आपल्या शेतामध्ये टाकावा व शेती सुपिक बनवावी तसेच गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी जास्तीत जास्त कामे आपण आपल्या गावात करून घ्यावी, असे आवाहन नागनाथवार यांनी केले. कारंजा तालुक्यात वन व कृषी विभागांतर्गत १०० हेक्टर क्षेत्रावर जलसंधारणाची कामे सुरू आहेत. यावेळी सरपंच शेख यांचा सत्कार नागनाथवार यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्ह्यातील इतर ही गावांनी याच पध्द्तीने सहभागी होऊन आपलं गाव दुष्काळमुक्त करावे असे आवाहन करण्यात आले.