प्रत्येक गावात लोकसहभागातून होणार जलसंधारणाची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 03:01 PM2018-11-21T15:01:36+5:302018-11-21T15:02:10+5:30
वाशिम: भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) सहकार्याने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात लोकसहभागाने शक्य त्या सर्व गावांत जलसंधारणाची कामे करण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) सहकार्याने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात लोकसहभागाने शक्य त्या सर्व गावांत जलसंधारणाची कामे करण्यात येणार आहेत. मृद व जलसंधारण विभागाच्या अवर सचिवांनी जिल्हाधिकाºयांना २० नोव्हेंबर रोजी पाठविलेल्या पत्राद्वारे या संदर्भात सुचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या सुजलाम, सुफलाम अभियानाची व्याप्ती अधिक वाढणार आहे.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत येणारी कामे व जलयुक्त शिवार अभियानात समाविष्ट असलेली गावे सोडून इतर ठिकाणी नाला खोलीकरण व रुंदीकरण करणे, खोल सलग समतल चर, शेततळी व डोह यामधील गाळ काढण्याबाबत बीजेएसकडून प्राप्त मशीनसाठी डिझेलचा निधी देण्यात येत आहे, तसेच धरणांतील गाळ काढणे व तो शेतामध्ये वापरणे यासाठी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना शासनाच्यावतीने राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्यातील प्रत्येक गावांत काम करणे शक्य आहे. त्यामुळे ही वस्तूस्थित विचारात घेऊन राज्य शासन आणि बीजेएस या अशासकीय संस्थेदरम्यान झालेल्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने जिल्ह्यात ज्या ठिकाणी लोकसहभाग मिळेल, अशा सर्व ठिकाणी जलसंधारणाची कामे करण्याबाबत योग्य ती कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या मृद व जल संधारण विभागाच्यावतीने जिल्हाधिकाºयांना या संदर्भात २० नोव्हेंबर रोजी पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या सुजलाम, सुफलाम अभियानाची व्याप्ती अधिक वाढून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे होऊ शकणार आहेत.