मंगरुळपीर, कारंजा तालुक्यातील ग्रामस्थांनी केली १ लाख घनमीटर क्षेत्रावर जलसंधारणाची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 02:49 PM2018-05-03T14:49:04+5:302018-05-03T14:49:04+5:30
वाशिम: वॉटर कप स्पर्धेंसाठी निवड झालेल्या मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यातील ६० गावांत श्रमदानाच्या माध्यमातून जवळपास १ लाख घनमीटर क्षेत्रावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत
वाशिम: वॉटर कप स्पर्धेंसाठी निवड झालेल्या मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यातील ६० गावांत श्रमदानाच्या माध्यमातून जवळपास १ लाख घनमीटर क्षेत्रावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. आपले गाव पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थ झपाटले असून, वॉटर हिरोंच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे हे शक्य होऊ शकले आहे.
पाणी फांऊडेशनकडून राबविण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी यंदा वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्याची निवड झाली आहे. या तालुक्यातील ११५ गावांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज केले. त्यापैकी मंगरुळपीर तालुक्यात ३५, तर कारंजा तालुक्यात ३० गावांनी श्रमदानाच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामाला सुरुवात केली आहे. ७ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून या कामांना सुरुवात झाली. स्पर्धेसाठी कामांचे घनमीटर क्षेत्र निश्चित करण्यात आले असून, या गावांत निर्धारित उद्ष्टिानुसारच कामे होत आहेत. तथापि, गाव पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थ कमालीचे उत्साही असल्याने दोन्ही तालुक्यातील ६० गावांत मिळून १ लाख घनमीटरच्या क्षेत्रात जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. यामध्ये शेताची बांधबंदिस्ती, शेततळे, सीसीटी, माती नाला बांध, एलबीएस बंधारे, सीसीटीसह पाणलोट उपचारांच्या कामांचा समावेश आहे. या कामांसाठी काही ठिकाणी जेसीबी, पोकलॅण्ड मशीनचा आधारही घेण्यात आला असून, झालेल्या कामांमुळे संबंधित गावातील भूजल पातळी वाढून भावी काळात पाणीटंचाई आणि दुष्काळावर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे.