वाशिम जिल्ह्यातील धरणांची स्थिती गंभीर, धरणांमध्ये उरला गाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 05:30 PM2018-05-15T17:30:23+5:302018-05-15T17:30:23+5:30
वाशिम जिल्ह्यातील अडाण प्रकल्प वगळता इतर दोन मध्यम आणि १२३ लघू प्रकल्पांची स्थिती अत्यंत विदारक आहे.
वाशिम: वाशिम जिल्ह्यातील अडाण प्रकल्प वगळता इतर दोन मध्यम आणि १२३ लघू प्रकल्पांची स्थिती अत्यंत विदारक आहे. निम्म्याहून अधिक धरणांत मृतसाठाही उरला नसून, जनावरांच्या पिण्यासाठीही पाणी मिळेनासे झाले आहे. केवळ गाळ उरलेले हे प्रकल्प पुन्हा भरण्यासाठी आता पुढील पावसाळ्यात वार्षिक सरासरीपेक्षा खूप अधिक प्रमाणात पाऊस पडण्याचीच गरज आहे.
वाशिम जिल्ह्यात गतवर्षीच्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ८४ टक्के पाऊस पडला. त्यामुळे धरणांत मुबलक जलसाठा झाला नाही. परिणामी हिवाळ्याच्या मध्यातच जिल्ह्यातील निम्म्या धरणांनी तळ गाठायला सुरुवात केली. त्यामुळे जिल्ह्यात गत १० वर्षानंतर प्रथमच अत्यंत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यातच उन्हाचा पारा ४३ अशांच्या वर गेल्याने वाशिम जिल्ह्यामधील ३ मध्यम आणि १२३ लघू प्रकल्पांपैकी निम्म्या प्रकल्पांतील मृतसाठ्याचेही बाष्पीभवन होऊन आता या धरणांत केवळ ओला गाळच उरला आहे. त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्याही अभूतपूर्व भीषण झाली आहे. मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणारे मोतसावंगा धरण, मालेगाव शहराला पाणी पुरवठा करणारे कुरळा धरण, सोनल धरण अशा काही महत्त्वाच्या धरणांसह अनेक लघू प्रकल्पांत गाळच उरला आहे. त्यातच वाशिम तालुक्यातील सुपखेला येथील धरण, तर पूर्ण कोरडेच पडले असून, यातील गाळही सुकला आहे. त्यामुळे परिसरातील जनावरांचे पाण्याअभावी अतोनात हाल होत आहेत.