‘वॉटर कप २०१९’ : वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगरुळपीर तालुक्याचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 01:53 PM2018-12-21T13:53:08+5:302018-12-21T13:53:13+5:30
वाशिम : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘पाणी फाउंडेशन’च्या वतीने ‘सत्यमेव जयते वॉटर कप २०१९’ स्पर्धेची घोषणा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा येथील कार्यालयात करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘पाणी फाउंडेशन’च्या वतीने ‘सत्यमेव जयते वॉटर कप २०१९’ स्पर्धेची घोषणा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा येथील कार्यालयात करण्यात आली. राज्यातील जल संवर्धन, कृषी आणि ग्रामीण विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी हे व्हिडिओ कॉन्फरन्समार्फत या बैठकीत सामील झाले. ही स्पर्धा ८ एप्रिल ते २२ मे दरम्यान होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव प्रवीण परदेशी, पानी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेता आमीर खान, किरण राव, पाणी फाउंडेशन मुख्य कार्याकारी सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ, नामदेव ननावरे यामध्ये सहभागी झाले होते. वॉटर कप स्पर्धा २०१९ मध्ये पहिल्या विजेत्या तीन गावांना अनुक्रमे ७५ लाख रु., ५० लाख रु. आणि ४० लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्कृष्ट काम करणाºया गावाला १० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेत विजयी होणाºया गावांना देण्यात येणाºया एकूण बक्षिसांची रक्कम रु. ९.१५ कोटी राहणार आहे. स्पर्धेंतर्गत पाणी फाऊंडेशनच्या वतीने ‘पाणलोट विकासा’चे प्रशिक्षण लोकांना देण्यात येते. ४५ दिवसांच्या या कालावधीतील स्पर्धेत ‘श्रमदान’, पाणलोट उपचारांचे नियोजन आणि निर्मिती यांचा समावेश राहील. ज्यामुळे जमीनीतील भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. निवडलेल्या तालुक्यातील प्रत्येक महसूली गाव या स्पर्धेत भाग घेण्यास पात्र आहे. राज्यातील २४ जिल्ह्यांतील ७६ तालुक्यांमध्ये यावर्षी ही स्पर्धा होणार असून, यात वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्याचा समावेश आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ३१ जानेवारी २०१९ पर्यंत फॉर्म भरता येणार आहे. राज्याच्या जल समृद्धीचा प्रवास अखंड सुरू राहण्यासाठी पानी फाउंडेशनने निवडलेल्या तालुक्यांतील सर्व गावांना आमंत्रण देण्यात आले आहे.