Water cup competition : संयुक्त तिसरे बक्षीस वाशिमच्या बोरव्हा बु. गावाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 06:39 PM2019-08-11T18:39:59+5:302019-08-11T18:40:50+5:30
नागराज मंजुळे यांच्या हस्ते बोरव्हा बु. गावाला तिसऱ्या क्रमांकाचे संयुक्त बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील बोरव्हा गावाने वॉटर कप स्पर्धा २०१९ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करताना संयुक्त तिसरे बक्षीस पटकावत वाशिमच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा बालेवाडी पुणे येथे ११ आॅगस्ट रोजी पार पडला. पाणी फाऊंडेशनचे संस्थापक आमिर खान, मराठी चित्रपट निर्माता नागराज मंजुळे यांच्या हस्ते बोरव्हा बु. गावाला तिसऱ्या क्रमांकाचे संयुक्त बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
वॉटर कप स्पर्धेचे पहिले ५० लाख रुपयांचे बक्षीस सोलापूर तालुक्यातील बार्शी तालुक्यातील सुर्डी गावाने, दुसरे १५ लाखांचे बक्षीस संयुक्त पणे शिंदी खुर्द मान तालुका सातारा आणि अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिंप्री जलसेन या गावांना, तर तिसºया क्रमांकाचे १३ लाख ३५ हजारांचे बक्षीस सयुंक्तपणे मंगरुळपीर तालुक्यातील बोरव्हा बु, सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील शिंदी खुर्द, तसेच बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील देवरायाची वाडी या गावाने पटकावले. महाराष्ट्रातील ७६ तालुक्यातील ४७६० गावांनी यंदाच्या वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला होता. यात मंगरूळपीर तालुक्यातील ६१ गावे सहभागी होती. त्यापैकी ३१ गावांनी ५० दिवस स्पर्धेत जलसंधारणाची कामे केले त्यामधून राज्यातील टार्गेट बोरव्हा बु , तालुक्यातील टार्गेट पिंप्री खु, चिंचाळा, जांब या गावाने पूर्ण केले असल्याने तालुक्यात वॉटर कप कोण जिंकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सदर स्पर्धेचा निकाल ऐकून तालुक्यातील बोरव्हा बु , पिंप्री खु , चिंचाळा, जांब गावातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. या साठी वाशिम जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गवसाने, मंगरुळपीरचे उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे, पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक सुभाष नानवटे, मंगरूळपीर तालुका समन्वयक समाधान वानखडे, अतुल तायडे, तहसीलदार किशोर बागडे, गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे सह जिल्ह्यातील पत्रकार मंडळी, जलदुत, जलमित्र यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य दिल्या बद्दल गावाने कृत्यज्ञता व्यक्त केली.
(प्रतिनिधी)