रिसोड शहरातील पाणीपुरवठा योजनेचे नियोजन कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 04:55 PM2019-07-24T16:55:21+5:302019-07-24T16:55:31+5:30
रिसोड (वाशिम) : रिसोड शहराला नवव्या दिवसानंतर बुधवार, २४ जुलै रोजी पाणीपुरवठा झाला. गत दोन महिन्यांपासून पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याचे दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : रिसोड शहराला नवव्या दिवसानंतर बुधवार, २४ जुलै रोजी पाणीपुरवठा झाला. गत दोन महिन्यांपासून पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याचे दिसून येते.
रिसोड शहराला अडोळ प्रकल्पातुन पाणीपुरवठा होतो. दरवर्षी इतरत्र पाण्याची टंचाई असतानाही या प्रकल्पात जलसाठा राहत असल्याने रिसोड शहरामध्ये भरपूर प्रमाणात पाणी मिळते. पावसाळा, हिवाळा या ऋतुमध्ये तीन दिवसानंतर पाणी मिळते. उन्हाळ्यात उपलब्ध पाणी लक्षात घेऊन पाचव्या दिवशी पाणीपुरवठा केला जातो. मागील दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा योजनेचे नियोजन पुरते कोलमडले असून नऊ दिवसांपासून शहरवासीयांना पाणीपुरवठा झाला नव्हता. २४ जुलै रोजी पाणीपुरवठा झाला आहे. मागील दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा विषयी अनेक समस्या निर्माण होत आहेत. कधी विद्युत रोहित्र जळते तर कधी पाईपलाईन फुटून पाणीगळती होते. २० दिवसांपूर्वी शहरात काही ठिकाणी पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाण्याचा अपव्यव झाला होता. योग्य नियोजन नसल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. याचा फटका शहरवासियांना बसत आहे. यासंदर्भात नगर परिषदेचे पाणीपुरवठा सभापती मिरा संतोष चºहाटे म्हणाल्या की, पाणीपुरवठा योजना प्रभावित होउ नये यासंदर्भात संबंधित अभियंत्यांना सूचना दिलेल्या आहेत. विद्युत रोहित्रदेखील अधून-मधून नादुरूस्त राहते. विद्युत रोहित्राची दुरूस्ती झाल्याने २४ जुलै रोजी पाणीपुरवठा पूर्ववत झाला. यापुढेही नियमित पाणीपुरवठा होईल याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.