पुराचे पाणी घुसले शेतात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:47 PM2019-06-29T12:47:02+5:302019-06-29T12:47:08+5:30
वाशिम : जिल्ह्यातील शेलुबाजार परिसर, कारंजा परिसरात शुक्रवारी दुपारनंतर धो-धो पाऊस कोसळला. महामार्गांच्या कामादरम्यान रस्त्यालगत नाल्या करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे पुराचे पाणी शेतात घुसले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील शेलुबाजार परिसर, कारंजा परिसरात शुक्रवारी दुपारनंतर धो-धो पाऊस कोसळला. महामार्गांच्या कामादरम्यान रस्त्यालगत नाल्या करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे पुराचे पाणी शेतात घुसले. मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजारसह परिसरातील शेकडो हेक्टर शेतांत हे पाणी घुसले. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत ‘लोकमत’ने यापूर्वीच वृत्त प्रकाशित करून या संदर्भात महामार्ग प्राधिकरणचे लक्ष वेधले होते, हे विशेष.
शेलुबाजार : शुक्रवारी दुपारनंतर शेलुबाजार परिसरातील गोगरी, हिरंगी, लाठी, चिखली, कंझरा, पिंप्री अवगण या गावात धो-धो पाऊस कोसळल्याने नदीनाल्याना पुर आला. यामुळे पेरणी केलेली बियाणे वाहून गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ३२ मीमी पाऊस झाल्याची नोंद आहे.
मंगरुळपीर ते शेलूबाजार दरम्यान राष्ट्रीय प्राधिकरण मंडळाच्यावतीने रस्त्याचे काम सुरु आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शेलूबाजार व खंड्या नाल्याच्या पुलाचे काम सुरु करण्यात आले. पुलाचे काम करताना वाहतुकीसाठी योग्यरित्या पर्यायी रस्ता तयार केला नाही तसेच पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नालीचे कामही केले नाही. शुक्रवारी पहिल्याच पावसामुळे पूर आल्याने सायंकाळी ४ वाजेपासून ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मंगरुळपीर-शेलुबाजार मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. संबंधित कंत्राटदाराच्या हलगर्जीमुळे पहिल्याच पावसात वाहनधारकांसह शेतकºयांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. अडान नदीच्या ठिकाणी पर्यायी रस्ता तयार करताना पाईप टाकणे गरजेचे होते. परंतु पाईप टाकण्यात आले नाहीत. अडान नदी व खंड्या नाल्याला आलेल्या पुरामुळे निर्माणाधिन पुलाला धक्का बसण्याची भीती वर्तविली जात आहे. पुरामुळे अडाण नदीवरील पुलाखाली उभारण्याच्या आलेल्या ‘सेंट्रींग’चा काही भाग खाली कोसळला.
‘लोकमत’ने वेधले होते प्रशासनाचे लक्ष
जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने नाल्याच ठेवल्या नाहीत. त्यामुळे पावसाचे पाणी थेट शेतात जाऊन नुकसान होण्याची शक्यता ‘लोकमत’ने २७ जूनच्या अंकात वर्तवून याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, याऊपरही याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष दिले नाही. २८ जून रोजी शेलुबाजार परिसरात धो-धो पाऊस झाला असून, या पावसाचे पाणी शेतात घुसल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अडाण नदी पात्रावर पूल बांधकाम सुरू असून, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाल्या ठेवण्यात आल्या नाहीत. त्यामुळे शेकडो एकर शेतीत पाणीच पाणी झाल्याचे दिसून आले. यातील काही क्षेत्रात शेतकºयांनी पेरणीही केली आहे. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.