व्हॉल्वमधील पाण्याच्या गळतीने शेती चिभडली!
By admin | Published: June 17, 2017 07:35 PM2017-06-17T19:35:52+5:302017-06-17T19:35:52+5:30
अडोळ प्रकल्पावरून रिसोडकडे जाणार्या जलवाहिनीवर लावण्यात आलेला व्हॉल्व नादुरूस्त.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोराळा (वाशिम) : अडोळ प्रकल्पावरून रिसोडकडे जाणार्या जलवाहिनीवर लावण्यात आलेला व्हॉल्व नादुरूस्त होवून लाखो लिटर पाण्याची नासाडी सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे व्हॉल्वनजिक असलेल्या शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होवून जमीन चिभडली आहे.
अडोळ प्रकल्प ते रिसोड शहरादरम्यानच्या जलवाहिनीवर ठिकठिकाणी व्हॉल्व बसविण्यात आले आहेत. ते आजमितीस कालबाह्य झाल्यामुळे महिन्यातून अनेकवेळ नादुरूस्त होवून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतो. ढोरखेडा गावानजिकचा व्हॉल्व १४ जून रोजी नादुरूस्त झाला. तेव्हापासून आजपयर्ंत (१७ जून) त्याच्या दुरूस्तीकडे लक्ष पुरविण्यात आलेले नाही. परिणामी, अडोळ प्रकल्पातील लाखो लिटर पाणी वाया जात असून नजिकच्या शेतजमिनींमध्ये पाणी घुसून ती चिभडत आहे. शेतकरी वामनराव मिटकरी यांच्या शेतीचे यामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. जलसंपदा विभागाने ही बाब गांभीर्याने घेऊन विनाविलंब व्हॉल्व दुरूस्त करून होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी जोर धरत आहे.