वाशिम जिल्ह्यातील ७५ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 05:23 PM2018-03-13T17:23:35+5:302018-03-13T17:25:34+5:30
वाशिम : एकीकडे उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चाललेला असताना दुसरीकडे जिल्ह्यातील लघु आणि मध्यम अशा १३१ प्रकल्पांमध्ये आजरोजी केवळ ११ टक्क्याच्या आसपास पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे.
वाशिम : एकीकडे उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चाललेला असताना दुसरीकडे जिल्ह्यातील लघु आणि मध्यम अशा १३१ प्रकल्पांमध्ये आजरोजी केवळ ११ टक्क्याच्या आसपास पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. त्यातही गंभीर बाब म्हणजे ७५ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर पोहचली असून ग्रामीण भागातील हातपंप, कुपनलिका यासह इतर जलस्त्रोतही कोरडे पडण्याच्या मार्गावर असल्याने शेकडो गावे पाणीटंचाईच्या सावटाखाली आली आहेत. दरम्यान, या बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून ठोस उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली असून त्याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष पुरवावे, अशी मागणी जोर धरत आहे.
जलसंपदा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील तीन मध्यम आणि १२८ लघु अशा १३१ प्रकल्पांमध्ये सद्या ११ टक्क्याच्या आसपासच पाणीसाठा शिल्लक राहिलेला असून तब्बल ७५ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर पोहचली आहे. शून्य ते १० टक्के पाणीसाठा शिल्लक असलेले १५ प्रकल्प आहेत. १० ते २५ टक्के पाणीसाठा शिल्लक असलेल्या १९ प्रकल्पांचा समावेश असून ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा असणारे केवळ ३ प्रकल्प आहेत.
तथापि, प्रकल्पांमधील पाणीसाठ्यासंदर्भात उद्भवलेल्या या विदारक परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेकडो गावे पाणीटंचाईच्या संकटात सापडली आहेत. त्यावर मात करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून ठोस अंमलबजावणीची गरज निर्माण झाली आहे.