‘मडाण’ नदीचे खोलीकरण मिटविणार १३ गावांची पाणी समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 05:42 PM2019-01-11T17:42:38+5:302019-01-11T17:42:43+5:30
मंगरुळपीर (वाशिम) : राज्य शासन आणि बीजेएसच्या सामंजस्य करारातून सुरू असलेल्या सुजलाम, सुफलाम, अभियानांतर्गत मंगरुळपीर तालुक्यातील मानोली येथील मडाण नदीचेही खोलीकरण करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर (वाशिम) : राज्य शासन आणि बीजेएसच्या सामंजस्य करारातून सुरू असलेल्या सुजलाम, सुफलाम, अभियानांतर्गत मंगरुळपीर तालुक्यातील मानोली येथील मडाण नदीचेही खोलीकरण करण्यात येणार आहे. या नदीच्या खोलीकरणामुळे १३ गावांतील पाणीसमस्या कायमची हद्दपार होणार असून, नदीच्या खोलीकरणापूर्वी सिंचन विभागाच्या सहकार्याने करण्यात येत असलेले उपनाल्यांचे खोलीकरण आता अंतिम टप्प्यात आले आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील मानोली येथील मडाण नदी गेल्या अनेक वर्षांपासून गाळ उपसा न झाल्याने बुजल्यात जमा आहे. कधीकाळी या नदीच्या भरवशावर परिसरातील १३ गावांत सिंचन शेती केल्या जात होती, याच नदीच्या भरवशावर मासेमारी व्यवसायही भरभराटीस आला होता; परंतु कालाओघात या नदीकडे प्रशासन आणि ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष झाल्याने ही नदी बुजत गेली. या नदीपात्रात मोठमोठी झाडेही वाढली. सतत जमा होणाºया गाळामुळे नदीचे पात्र उथळ आणि अरूंद झाले. त्यामुळे १२६०० मीटर लांबीच्या या नदीवर अवलंबून असलेल्या १३ गावांत पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. या नदीचे खोलीकरण सुजलाम, सुफलाम, अभियानातून होत असून, त्यापूर्वी नदीच्या उपनाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येत आहे. तब्बल १५०० मीटर लांबीच्या या नाल्याचे खोलीकरण अंतिम टप्प्यात आले असून, या कामामुळे परिसरातील पाणीसमस्या कायम हद्दपार होईलच शिवाय सिंचनाच्या क्षेत्रातही लक्षणीय वाढ होणार आहे. केंद्रीय जलसंधारण मंत्री नितिन गडकरी यांनी या नदीच्या खोलीकरणासाठी पुढाकार घेत शासनाकडे शिफारसही केली होती, हे येथे उल्लेखनीय.