जलजन्य आजार टाळण्यासाठी पाणी नमुने तपासणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:53 PM2018-07-29T12:53:12+5:302018-07-29T12:58:04+5:30
वाशिम : जिल्ह्यातील नागरिकांना पिण्यायोग्य स्वच्छ पाणी मिळावे, जलजन्य आजार टाळण्याच्या दृष्टिकोनातून पाणी पुरवठा विभागाच्यावतीने जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायती अंतर्गत असलेले जलस्त्रोत तपासले जात आहे.
वाशिम : जिल्ह्यातील नागरिकांना पिण्यायोग्य स्वच्छ पाणी मिळावे, जलजन्य आजार टाळण्याच्या दृष्टिकोनातून पाणी पुरवठा विभागाच्यावतीने जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायती अंतर्गत असलेले जलस्त्रोत तपासले जात असून, पाण्यात कोणत्या क्षारघटकांची कमतरता आहे याची माहिती घेतली जात आहे.
पावसाळ्याच्या दिवसात जलजन्य आजार तसेच दूषित अन्न-पाण्याच्या प्रकारातून टायफॉईड, कावीळ, जुलाब व अन्य आजार उद्भवतात. जलजन्य आजार टाळण्यासाठी पाणी नमुने तपासणी सुरू असून, शुद्ध पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले. ग्रामस्तरावर ग्रामपंचायतीसाठी जलसुरक्षा रक्षक असून, पाणी तपासणी केल्यानंतरच नागरिकांना आपापल्या गावातील पाणी पिण्यायोग्य आहे की नाही हे लक्षात येणार आहे़. दर महिन्याचा अहवाल हा साधारणत: महिना संपल्यानंतर पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तयार केला जाणार आहे. त्या अनुषंगाने दूषित पाणीपुरवठा होत असलेल्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे. जलस्त्रोतात पुरेशा प्रमाणात ब्लिचिंग पावडर टाकण्याच्या सूचनाही जिल्हा परिषद प्रशासनाने दिलेल्या आहेत.
काही गावात हातपंप, विहिरीजवळच कपडे धुणे, नालीचे पाणी साचत असल्याने जलस्त्रोत दूषित होतात. यापूर्वी दूषित पाणी आढळून आलेल्या स्रोतांची व परिसराची स्वच्छता करण्याकडेही ग्रामपंचायतींकडून लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येते. दूषित पाणीपुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नका, अशा सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या आहेत.