१६ गावांना पाणीटंचाईच्या झळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:45 AM2021-05-25T04:45:56+5:302021-05-25T04:45:56+5:30
कारंजा लाड : कारंजा तालुक्यात ९१ ग्रामपंचायती असून १३५ गावे आहे. तालुक्यातील १६ गावांना पाणीटंचाईची झळ असून, पाणीटंचाई बाबत ...
कारंजा लाड :
कारंजा तालुक्यात ९१ ग्रामपंचायती असून १३५ गावे आहे. तालुक्यातील १६ गावांना पाणीटंचाईची झळ असून, पाणीटंचाई बाबत पंचायत समितीकडून उपाययोजना केल्या जात आहेत. दोन गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे.
दरवर्षी कारंजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी हाहाकार उडतो. मात्र मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने व भारतीय जैन संघटनेने केलेली जलसंधारणाची कामे व जलयुक्त शिवारच्या माध्यमातून झालेल्या कामामुळे पाणीटंचाईची धग यंदा कमी प्रमाणात बघायला मिळत आहे.
कारंजा तालुक्यात एप्रिल महिन्याच्या १६ तारखेपासून पाणीटंचाईची धग कमी करण्यासाठी उपाययोजनांच्या अंमलबजावणीस प्रारंभ झाला. १४ पैकी १२ गावांतील विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या. यामध्ये बेंबळा, धामणी, कामरगाव, म्हसला, भामदेवी, सुकळी, जांब, भडशिवणी, अजमपूर, वापटी, वढवी, काजलेश्वर या गावांचा समावेश आहे. गिरडा व धोत्रा देशमुख या गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता ६ गावात विशेष नळ योजना दुरुस्ती प्रस्तावित करण्यात आली आहे. यामध्ये सुकळी, नारेगाव, कमठवाडा, खेर्डा कारंजा, भामदेवी, उंबर्डा बाजार या गावांचा समावेश आहे.
मागील वर्षी कारंजा तालुक्यात २२ गावे पाणीटंचाईच्या कक्षेत होते. मात्र यावर्षी पाणीटंचाईची धग कमी असल्याचे चित्र कारंजा तालुक्यात दिसून येत आहे.
००००००
कोट
कारंजा पंचायत समिती पाणीटंचाई बाबत दक्ष असून १२ गावांत विहीर अधिग्रहण केले तर २ गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील पाणीटंचाई समस्या नियंत्रणात आहे.
कालिदास तापी
गटविकास अधिकारी, पंचायत समिती कारंजा