अमरावती विभागातील पाणी टंचाईग्रस्त गावांना टँकरची प्रतीक्षा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 04:46 PM2019-04-03T16:46:24+5:302019-04-03T16:46:32+5:30
वाशिम : अमरावती विभागातील पाचही जिल्हयातील पाणी टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू होणे अपेक्षीत आहे.
वाशिम : अमरावती विभागातील पाचही जिल्हयातील पाणी टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू होणे अपेक्षीत आहे. बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक १०८ तर अमरावती ३ आणि यवतमाळ जिल्ह्यातील एका टँकरचा अपवाद वगळता उर्वरीत वाशिम व अकोला जिल्हयातील टंचाईग्रस्त गावाला टँकरची प्रतिक्षा कायम आहे.
गतवर्षी पावसाने सरासरी गाठली नसल्याने यावर्षी अमरावती विभागातील अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. विभागातील बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाईची तिव्रता असून तेथे टँकरने पाणीपुरवठा करण्याचे सर्वाधिक प्रस्ताव आहेत. आतापर्यंत जवळपास १०८ टँकरला मंजूरी मिळालेली आहे. अमरावती, यवतमाळ, वाशिम व अकोला जिल्ह्यातही पाणीटंचाई असून, टँकरने पाणीपुरवठा करावा, यासंदर्भात प्रशासनदरबारी प्रस्ताव पाठविण्यात आलेले आहेत. ३१ मार्चपर्यंत अमरावती जिल्ह्यात ३ आणि यवतमाळ जिल्ह्यात १ टँकर सुरू आहे. दुसरीकडे वाशिम व अकोला जिल्ह्यातील टँकरच्या प्रस्तावांना मंजूरी नसल्याने अद्याप टँकर सुरू होऊ शकले नाही. वाशिम जिल्ह्यातील जवळपास १४ गावांचे टँकरसंदर्भात प्रस्ताव आहेत. मात्र, अद्याप मंजूरी मिळालेली नसल्याने टंचाईग्रस्त गावातील नागरिकांना टँकरची प्रतीक्षा कायम आहे. टँकरने पाणीपुरवठा नसल्याने पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी गावकऱ्यांना मैलभर पायपिट करावी लागत आहे. टँकरच्या प्रस्तावांना मंजूरी द्यावी, अशी मागणी टंचाईग्रस्त गावातील नागरिकांमधून होत आहे.