पाणीटंचाईमुळे मानोरा तालुक्यात हाहाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 03:25 PM2019-04-30T15:25:46+5:302019-04-30T15:26:05+5:30
मानोरा ( वाशिम ) : तालुक्याला भीषण पाणी टंचाईने ग्रासले आहे. घोटभर पाण्यासाठी महिलांची दिवस, रात्र भटकंती होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा ( वाशिम ) : तालुक्याला भीषण पाणी टंचाईने ग्रासले आहे. घोटभर पाण्यासाठी महिलांची दिवस, रात्र भटकंती होत आहे. पाणी टंचाई निवारणासाठी अनेक ग्रामपंचायतींनी शासनाकडे दोन ते तीन महिन्यापासून प्रस्ताव पाठविले आहेत; परंतु त्यापैकी एकाही प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यावाचून होरपळ होत असल्याचे दिसत आहे.
मानोरा तालुक्यात पाणी टंचाईने उग्र रुप धारण केले असून, ६६ गावांना पाणी टंचाईचे चटके जाणवत आहेत. पाण्यासाठी भर उन्हात महिला दिवसरात्र वणवण करीत आहेत. त्यातच उज्वलनगर, पाळोदी, परिसरात अतिशय तीव्र पाणी टंचाई जानवत आहे. घोटभर पाण्यासाठी विहीरीवर महिलांची झुंबड पहावयास मिळत आहे. पाळोदीचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी मोठी आंदोलन करण्यात आली होती, टँकरने पाणी पुरवठा करावा यासाठी गलमगाव आणि पाळोदी ग्रामपंचायतने दोन ते तीन महिन्यांपूर्वी प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला परंतु अद्यापही टँकरचा पाणी प्रश्न मार्गी लागला नाही. पाणीटंचाई निवारणाबाबत प्रशासन उदासीन असल्याने देऊरवाडी ग्रामपंचायतने २९ एप्रिल रोजी तातडीने सभा घेऊन पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊन अघटित प्रकार घडल्यास प्रशासन जबाबदार अशा ठराव घेतला. त्याशिवाय सावरगाव फारेस्ट, धानोरा बु, हातोली, वडगाव, शेंदोना तांडा, शेंदोना , पोहरादेवी, बालाजीनगर, वसंतनगर, आसोला बु, गोस्तासह अनेक गावात पाणी टंचाई जानवत आहे. दरम्यान, मानोरा पंचायत समितीने ६६ गावासाठी विहीर अधिग्रहण व ५ गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी तहसीलस्तरावर प्रस्ताव पाठवले, परंतु अद्याप यातील एकाही प्रस्तावाला मंजुर मिळाली नाही.
दुषित पाण्यामुळे गलमगावात अतिसाराची लागण
मानोरा तालुक्यातील ग्रामीण भागांत पाणीटंचाईने रुद्र रुप धारण केले आहे. गलमगावातही ही स्थिती असून, पर्यायी योजना नसल्याने ग्रामस्थ हातपंपांचे पाणी पिण्यासाठी वापरत आहेत. भुजल पातळी खोल गेल्याने हातपंपांचे पाणी दुषित झाले आहे. त्यामुळे येथील अनेक ग्रामस्थांना अतिसाराची लागण झाली आहे. यावर नियंत्रणासाठी आरोग्य विभागाचे पथकही गलमगाव येथे दाखल झाले असून, त्यांनी जलस्त्रोतातील पाण्याची तपासणी केली. त्यानुसार ग्रामपंचायत प्रशासनाला गावातील हातपंप बंद करण्याच्या सुचनाही दिल्या आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने टँकरने पाणी पुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.