पाणीटंचाईत होरपळतोय निम्मा वाशिम जिल्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 03:24 PM2019-06-12T15:24:19+5:302019-06-12T15:24:27+5:30
वाशिम : जून महिन्याचा पूर्वार्ध संपत आला तरी, जिल्ह्यातील जवळपास निम्म्या गावांतील पाणीटंचाईची समस्या कायमच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जून महिन्याचा पूर्वार्ध संपत आला तरी, जिल्ह्यातील जवळपास निम्म्या गावांतील पाणीटंचाईची समस्या कायमच आहे. मान्सून लांबल्याने ही समस्या आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ७९१ पैकी ३०९ गावांत ३८३ पाणीटंचाई निवारणाच्या योजना राबविण्यात येत आहेत.
गतवर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडला. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या जाणवणार नाही, असे वाटू लागले; परंतु वाढते उष्णतामान, सिंचनासाठी केलेला बेलगाम उपसा यामुळे प्रकल्पांनी हिवाळ्यातच तळ गाठला, तर भुजल पातळी १ मीटरपेक्षा अधिक खालावली. परिणामी विहिरी, कूपनलिकांनी तळ गाठला आणि ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली. पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने ४ कोटी ६० लाख रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे. या अंतर्गत जून २०१९ पर्यंत अर्थात चालू महिन्यापर्यंत ५०४ गावांसाठी ४८१ उपाय योजना प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. या कृती आराखड्यानुसार २२ गावांसाठी ८ इंधन विहिर दुरुस्ती, १३ गावांसाठी ४ तात्पुरत्या नळ योजना, ३६ गावांत टँकरने पाणी पुरवठा आणि ४३३ गावांत विहिर, कूपनलिका अधिग्रहणाच्या उपाय योजना प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ३०९ गावांत पाणीटंचाई निवारणासाठी ३८३ उपाय योजना राबविण्यात येत असून, यात ३२१ गावांत विहिर, कूपनलिका अधिग्रहण, ५५ गावांत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे, तर ७ नळ योजनांची दुरुस्ती करण्यात आली आहे. या कृती आराखड्याचा कालावधी जून महिन्यापर्यंतच असून, महिन्याचा पूर्वार्ध संपला तरी, अद्याप मृग नक्षत्राचा पाऊस पडला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या मिटण्याची शक्यता कमीच आहे. तेव्हा पुढे पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासन कोणते उपाय करते किंवा कोणता निर्णय घेते ती बाब अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
पाणीटंचाई उपाययोजनांची स्थिती
- गावे - ३०९
- योजना ३८३
- विहिरी, कूपनलिका ३२१
- टँकर ५५
- नळ दुरुस्ती ०७
जिल्ह्यातील पाणीटंचाईची स्थिती गंभीर आहे. पुढेही ही समस्या कायम राहिल्यास पाणीटंचाई कृती आराखड्याला मुदतवाढ देऊन उपाययोजना राबविण्यात येतील. सद्यस्थितीत ३०९ गावात उपाययोजना सुरू आहेत.
- शैलेश हिंगे,
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम