पूनर्वसित पांगरखेडा गावात पाण्यासाठी हाहा:कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 04:16 PM2018-03-22T16:16:56+5:302018-03-22T16:16:56+5:30
शिरपूर जैन : मिर्झापूर लघुसिंचन प्रकल्पामुळे बुडित क्षेत्रात समाविष्ट झालेल्या पांगरखेडा गावाचे पूनर्वसन शिरपुरच्या ई क्लास जमिनीवर करण्यात आले, मात्र अद्यापही पूनर्वसित गावात सार्वजनिक पाणी पुरवठा सुविधा निर्माण करण्यात आली नाही.
शिरपूर जैन : मिर्झापूर लघुसिंचन प्रकल्पामुळे बुडित क्षेत्रात समाविष्ट झालेल्या पांगरखेडा गावाचे पूनर्वसन शिरपुरच्या ई क्लास जमिनीवर करण्यात आले, मात्र अद्यापही पूनर्वसित गावात सार्वजनिक पाणी पुरवठा सुविधा निर्माण करण्यात आली नाही. तसेच अंतर्गत रस्ते अद्यापही कच्चेच आहेत. गावात पाणीच नसल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत आहे.
मालेगाव तालुक्यात मिर्झापूर लघुसिंचन प्रकल्पाचे काम २००९ पासून सुरु आहे. या प्रकल्पामध्ये बुडित क्षेत्रात पांगरखेडा गाव समाविष्ट झाले. त्यामुळे या गावाचे शिरपुरच्या ई क्लास जमिनीवर २०१३-१४ मध्ये करण्यात आले. यासाठी शासनाने पक्के रस्ते , पाणी पुरवठा योजना अशा मुलभूत गरजा पूनर्वसनाअगोदरच निर्माण करणे बंधनकारक असतांना तसे मात्र करण्यात आले नाही. परिणामत: दरवर्षी मार्च महिन्यात पाण्याची पातळी खोलवर जात असल्याने खासगी बोअर कोरडे पडले आहेत. त्यामुळे गावकऱ्यांना शेतातील विहिरीवरुन बैलगाडी अथवा टॅ्रक्टर, टँकरने पाणी आणावे लागत आहे. शासनाने पूनर्वसित गावात दोन जलकुंभ बांधले आहेत. त्यापैकी एकाला छिद्र पडले आहे तर दुसरा सार्वजनिक पाणी पुरवठा योजनाच नसल्याने कोरडा आहे. थोडा फार आधार सरपंच फुलंगा चव्हाण यांच्या खासगी बोअरमध्ये असलेल्या जलसाठयाचा गावकऱ्यांना उपयोग होतो.
याबाबत मागील दहा महिन्यांपासून लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात चौकशी केली असता सार्वजनिक विहिर निर्माण करण्यासाठी निवीदाची कारवाई सुरु असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात अजुनही निविदा कारवाई पूर्ण झाली नसल्याचे समजते. पाणी टंचाईसह गावात पक्के रस्ते नसल्याने रस्त्याची समस्या आहे.
२०१३ - १४ मध्ये पांगरखेडा गावाचे पूनवर्सन होऊनही या गावात अद्यापही पाणी पुरवठयाची सोय नाही. रस्ते ही अद्याप कच्चेच आहेत. या एकाप्रकारे आमच्यावर अन्याय आहे.
- संतोष गावंडे, पूनर्वसित पांगरखेडा, रहिवासी